जिल्ह्यातील १८ ते १९ वयोगटातील लोकसंख्या सुमारे ३ लाख ५९ हजार ८३९ असून या वयोगटातील मतदार संख्या केवळ ६५ हजार ८५१ आहे. त्यामुळे २ लाख ९३ हजार ९८८ युवकांनी अजुनही मतदार नोंदणी केलेली नाही.तसेच पुणे शहरात राज्याच्या विविध भागातून आलेले विद्यार्थी शिक्षणासाठी ३ ते ५ वर्षे वास्तव्य करीत असल्याने त्यांची मतदार नोंदणी पुण्यात किंवा त्यांच्या मूळगावी होणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यातील सुमारे ३५० महाविद्यालयांमध्ये १४ सप्टेंबरला महाविद्यालयातील पात्र नवमतदारांची १०० टक्के मतदार नोंदणी करण्यासाठी विशेष नवमतदार नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे.याबाबत महाविद्यालयांनी या अभियानात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक प्रक्रिया सर्वसमावेशक व्हावी यासाठी हा कार्यक्रम महत्वाचा आहे. आयोगाच्या सूचनेनुसार नागरिकांना वर्षातून चार वेळा म्हणजेच १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै, १ ऑक्टोबर या अर्हता दिनांकावर मतदार नोंदणी करता येणार आहे. याबाबत महाविद्यालयाच्या प्रतिनिधींना बैठकीच्या माध्यमातून माहिती देण्यात आली असून समन्वयक अधिकारी आणि दोन प्रतिनिधींना ऑनलाईन मतदार नोंदणीचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे, असे देशमुख म्हणाले.