सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी रोडवर बांधकाम व्यावसायिकाने एकावर गोळीबार केल्याची धक्कादायक घडना घडली आहे. आज (24 जानेवारी) भरदिवसा ही घटना घडल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे.यामध्ये एकजण जखमी झाला आहे. रमेश जाधव असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी गोळीबार करणार्या संतोष पवार याला सिंहगड रोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप ग्रुपवर झालेल्या चॅटिंगवरून दोघांची बाचाबाची झाली होती. त्यावरुन बांधकाम व्यावसायिक संतोष पवारने रमेश राठोडवर गोळीबार केला. सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या परिसरातच ही घटना घडली. संतोष पवार देवा राठोड आणि रमेश राठोड यांच्यासह इतर काहीजण सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी रोडवरील योगीराज अॉटो सेंटरमध्ये बोलत थांबले होते. त्यावेळी देवा राठोड यांनी त्यांच्याकडे असलेल्या एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर संतोष पवार यांच्याबद्दल एक पोस्ट टाकली. त्यावरुन वादावादी झाली. हे भांडण रमेश राठोड यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संतोष पवार यांनी रमेश राठोड यांच्यावर गोळीबार केला. यात त्यांच्या पायाला गोळी लागली. त्यांच्या पायाला जखम झाली. त्यानंतर त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पवार यांच्याकडे परवाना असलेले पिस्तुल आहे. त्याच्या संरक्षणासाठी एक पोलिस कर्मचारी देखील आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
पुण्यात किरकोळ वादावरुन होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यात अनेक जण सर्रास हवेत गोळीबार करण्याच्या घटना समोर येत आहेत. सकाळीच शेकोटी पेटवण्यावरून झालेल्या किरकोळ वादामधून हवेमध्ये गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती. पुण्यातील वडगाव शेरी जवळील ब्रह्मा सनसिटी या ठिकाणी असलेल्या अर्नोल्ड स्कूल समोर रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली होती. गोळीबारानंतर परिसरात खळबळ उडली होती. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अमित सिंग यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. अमित सिंग यांचा आईस्क्रीमचा ब्रॅंड आहे. त्यांची हडपसरला फॅक्टरी असून त्यांच्या आठ ते नऊ फॅन्चायसी दिलेल्या आहेत. ते कल्याणी नगरमधील सिलीकॉन बे येथे राहतात. तेथील रस्त्याच्या डेड एन्डला एका ठिकाणी काही तरुण शेकोटी करुन शेकत बसले होते. त्यावेळी ही घटना घडली.