पुणेः पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल वैशालीचा वाद पुन्हा पेटला आहे. हॉटेलच्या मालक असलेल्या निकिता शेट्टी यांनी आता आपल्या पती विरोधात आरोप केले आहेत. चार वर्षाच्या मुलीला घेऊन पती मागील दोन महिन्यापासून बेपत्ता आहे, असा आरोप त्यांनी केला आहे, तसंच, मुलीला शोधून द्यावे आणि पतीला अटक करण्यात यावी, अशी मागणी निकीता शेट्टी यांनी केली आहे.
पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील प्रसिद्ध हॉटेल वैशालीचा वाद अजूनही संपताना दिसत नाही. हॉटेल वैशालीची पावर ऑफ अॅटर्नि बंदुकीचा धाक दाखवून आपल्या पतीनेच नावावर करून घेतल्याचा आरोप हॉटेलच्या मालकीण असलेल्या निकिता शेट्टी यांनी केला होता. त्यानंतर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी कौटुंबिक छळाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणात निकीता शेट्टी यांनी आणखी एक नवा आरोप केला आहे.