खेलो इंडिया योजनेअंतर्गत पुण्यातील बाबुराव सणस मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या अस्मिता महिला ऍथलेटिक्स लीग शहर आणि विभाग स्तरावरील स्पर्धेत पहिल्या दिवशी पुण्याच्या रुजुला भोसले आणि साक्षी बोऱ्हाडे यांनी प्रत्येकी दोन सुवर्ण पदके जिंकली. रुजुला भोसले हिने १०० आणि २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तर साक्षी बोऱ्हाडे हिने ८०० आणि १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई केली.
भारतीय क्रीडा प्राधिकरण मुंबई केंद्राने महाराष्ट्र ऍथलेटिक्स संघटनेच्या सहकार्यातून आयोजित केलेल्या या स्पर्धेत राज्यातील सर्व जिल्ह्यातून मिळून एकंदर ८५ ऍथलेट सहभागी झाले होते . १०० मीटर , २०० मीटर , ४०० मीटर , ८०० मीटर आणि १५०० ते ५ हजार मीटर धावण्याबरोबरच लांब उडी , तिहेरी उडी , गोळा फेक , थाळी फेक , भालाफेक अशा विविध १४ प्रकारच्या क्रीडा प्रकारांचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला होता . अन्य क्रीडा प्रकारातील ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत रिषिका शेट्टी हिने तर ५ हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत विजयालक्ष्मी कटारे हिने सुवर्ण पदक पटकावले.
लांब उडी क्रीडा प्रकारात शिल्पा जवाराजन , गोळाफेक मध्ये अमृता कटके , थाळीफेक स्पर्धेत अमीरा शाह आणि भालाफेक स्पर्धेत ईश्वरी धंगेकर यांनी सुवर्ण पदकाची कमाई केली . भर पावसात झालेल्या या स्पर्धेला पुणेकर क्रीडा रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
त्याचबरोबर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या शकुंतला खटावकर , गुरुबन्स कौर , रेश्मा पाटील आणि राखी गौड यांच्यासह अनेक महिला खेळाडू देखील यावेळी आवर्जून उपस्थित होत्या . महाराष्ट्र ऍथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष अभय छाजेड , सरचिटणीस सतीश उच्छिल , पुण्याच्या माजी महापौर दीप्ती चवधरी , आणि कुस्ती प्रशिक्षक बबिता सणस , वरुण त्यागी यांनी देखील यावेळी उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
देशभरातील महिला खेळाडूंना त्यांची ओळख निर्माण करण्याबरोबरच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी आणि क्रीडा क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी त्यांना सक्षम बनवणे हा या स्पर्धेमागचा मुख्य हेतू असल्याचे सतीश उच्छील यांनी सांगितले . खेलो इंडिया योजनेअंतर्गत यापूर्वी सलग दोन वर्षे आयोजित करण्यात आलेल्या अशा प्रकारच्या स्पर्धांमधून देशभरातील सुमारे २५ हजार महिला खेळाडू सहभागी झाले होते.