पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत चितेजवळ जादूटोण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यरात्री ही घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणात दोन तृतीयपंथीयांना अटक केली आहे. लक्ष्मी निबाजी शिंदे आणि मनोज अशोक धुमाळ असं दोन्ही आरोपींचं नाव आहे. त्यामुळं पुणे शहरात खळबळ उडाली आहे. पुण्यातील भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं निधन होऊन काही तास उलटत नाही तोच ही खळबळजनक घटना समोर आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आलं होतं. त्यानंतर काही वेळातच आरोपी लक्ष्मी शिंदे आणि मनोज धुमाळ हे स्मशानभूमीतील चितेजवळ आले आणि त्यांनी अघोरी कृती करायला सुरुवात केली. त्यानंतर आरोपी स्मशानभूमीत काही तरी करत असल्याचं स्मशानभूमीतील कर्मचाऱ्याच्या लक्षात आलं. त्यामुळं त्यानं या प्रकरणाची माहिती तातडीनं पोलिसांना दिल्यानं पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत आरोपींना रंगेहाथ पकडून अटक केली.
पोलिसांनी त्यांच्याकडून काही लोकांचे फोटो, बाहुल्या, लिंबू, सुया आणि हळदी कुंकू जप्त असे आक्षेपार्ह साहित्य जप्त केले आहेत. आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरोधात नरबळी, अमानुष अघोरी, दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम २०१३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय आरोपींनी हे कृत्य कशासाठी आणि कोणत्या कारणासाठी केलं, याचाही तपास पोलिसांनी सुरू केला आहे.