कल्याणची वैष्णवी पाटील आणि सांगलीची प्रतिक्षा बागडी यांच्यापैकी चा मान कोण पटकावणार, याची उत्सुकता शिगेला लागलेली होती. पण अंतिम फेरीचा लढत ही चांगलीच रंगली, पण अखेर प्रतिक्षा बागडीने बाजी मारली आणि प्रथम महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला. प्रतिक्षाने यावेळी वैष्णवीला चीतपट केले. प्रतिक्षाने यावेळी मानेवर एकेरी डावावर बाजी मारली.
या लढतीत प्रतिक्षाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला होता. त्यामुळे या लढतीच्या सुरुवातीला प्रतिक्षाने दोन गुणांची कमाई केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा प्रतिक्षाने दोन गुण कमावले आणि आपली आघाडी ४-० अशी नेली होती. पण दुसरीकडे वैष्णवीदेखील प्रतिक्षावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यामध्ये ती यशस्वी ठरली. वैष्णवीने फक्त एक जोरदार चाल खेळली आणि चार गुणांची कमाई केली. त्यामुळे हा सामना ४-४ अशा बरोबरीत आला होता. त्यामुळे हा सामना कोण जिंकणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पण त्यानंतर प्रतिक्षाने मानेवर एकेरी डाव टाकला आणि वैष्णवीला चीतपट करत प्रथम महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला.
वैैष्णवीने उपांत्य फेरीच्या लढतीत कोल्हापूरच्या कुशप्पाचा ११-१ असा मोठा विजय मिळवला होता. वैष्णवी या सामन्यात भन्नाट फॉर्मात दिसली होती. तिने कुशप्पाना सामना सुरु असताना मान वर काढण्याची जास्त संधीच दिली नाही. त्यामुळे धडाकेबाज खेळ करत वैष्णवीने उपांत्य फेरीचा सामना सहजपणे जिंकला होता.
प्रतिक्षा ही वसंतदादा कुस्ती केंद्र सांगली येथे कुस्तीचे धडे गिरवत आहे.तिला घरातूनच कुस्तीचे बाळकडू मिळाले ते म्हणजे वडील रामदास बागडी हे जुन्या काळातील नामवंत मल्ल.ते सध्या सांगली पोलीस दलात कार्यरत आहेत. प्रतिक्षाची आजवरची कामगिरी बघितली तर तिने तब्बल १२ वेळा राज्य स्पर्धेत पदके मिळवली आहेत आणि २२ वेळा राष्ट्रीय पातळीवर सहभाग आहे.महाराष्ट्राच्या महिला कुस्तीला उत्कृष्ट दर्जा मिळवून देण्याचे श्रेय खेळाडू म्हणून प्रतिक्षाला जाते.तिच्या यशानंतर बऱ्याच मुली कुस्तीत आल्या आणि पालकांचाही प्रतिसाद मुलीसाठी खूप महत्वाचा ठरत आहे.सध्या ती के.बी.पी.कॉलेज इस्लामपूर येथे पहिल्या वर्षात शिकत आहे.