इंधन खर्चात बचत व्हावी, लालपरीला पुन्हा ऊर्जितावस्था यावी म्हणून राज्यभरात इलेक्ट्रिक बससेवा सुरु केली जात आहे. याअनुषंगाने सोलापूर-पुणे इलेक्ट्रिक बससेवा आता १५ ऑगस्टपासून सुरू करण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाकडून सुरू आहे.
उन्हाळा असो वा पावसाळा, प्रवाशांना गावापर्यंत सेवा देणारी लालपरी आता अडचणीतून मार्ग काढू लागली आहे. वातानुकूलित बससेवेसोबतच आता इलेक्ट्रिक बससेवा देखील सुरू होत आहे. दरम्यान, सोलापूर विभागीय कार्यशाळेत चार्जिंग स्टेशनची उभारणी करण्यात आली आहे. ‘महावितरण’च्या माध्यमातून त्याची ट्रायल देखील नुकतीच पार पडली आहे. आता कंपनीकडे दहा बसगाड्यांची मागणी केली असून त्या १४ ऑगस्टपूर्वी मिळतील, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून त्या दिवशी इलेक्ट्रिक बससेवा सुरू करण्याचे नियोजन आहे.