बदलापूर एमआयडीसीमध्ये एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. अग्निशमन दलाचे जवान ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करीत आहेत. बदलापूर, अंबरनाथ एमआयडीसी, अंबरनाथ पालिका, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली आणि तळोजा एमआयडीसीमधील अग्निशामक दलाच्या गाड्या ही आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले असून ते ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या आगीत दोन कामगार जखमी झाल्याचे वृत्त आहे.
VIDEO: बदलापूर एमआयडीसीत भीषण आग, संपूर्ण केमिकल कंपनी जळून खाक, काही कामगार जखमीhttps://t.co/kZTo6B6vXI #fire #badlapurmidc #midchttps://t.co/Ktq0SkgTyM
— Maharashtra Times (@mataonline) February 12, 2023
बदलापूर एमआयडीसी मधील गगनगिरी फार्मा केमिकल नावाची कंपनीत ही आग लागली आहे. गगनगिरी फार्मा केमिकल कंपनीमध्ये विविध प्रकारचे फार्मा इंडस्ट्रीसाठी लागणारे केमिकल तयार करण्याचे काम केले जात होते. दरम्यान, आज दुपारी पावणे दोनच्या सुमारास अचानक या कंपनीमध्ये आग लागली. या कंपनीत ज्वलनशील पदार्थांचा साठा असल्यामुळे काही वेळातच या आगीने रौद्ररूप धारण केले.
बदलापूर पालिकेची अग्निशमन यंत्रणा समोरच असल्याने बदलापूर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. या जवानांनी ही आग तत्काळ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र कारखान्यात अत्यंत ज्वलनशील रसायन असल्यामुळे ही आग क्षणार्धात वाढली आणि संपूर्ण कंपनी या आगीच्या विळख्यात सापडली. यामुळे ही भीषण आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत.