बल्लारशाह वनपरिक्षेत्रातील कळमणा उपक्षेत्रात वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळले असून एका अशक्त मादी बछड्याला रेस्क्यू करून त्याच्यावर वन्यजीव उपचार केंद्रात उपचार केले जात आहेत. सदर घटना गुरुवारी उघडकीस आली. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसून या प्रकरणी वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बल्लारशाह वनपरिक्षेत्रातील कळमणा उपक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी हे वनात गस्तीवर असताना त्यांना कळमणा नियतक्षेत्रामधील वनखंड क्रमांक ५७२ मध्ये एक अशक्त वाघाचा बछडा दिसून आला. त्याला तात्काळ रेस्क्यू करून प्राथमिक उपचाराकरता चंद्रपूर येथील ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वन्यजीव उपचार केंद्रात नेण्यात आले. अशक्त बछडा ही मादी असून तिचे वय पाच महिने असल्याने तिला चंद्रपूर येथील वन्यजीव उपचार केंद्रात पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या निगराणीत ठेवण्यात आलेले आहे.
त्यानंतर त्याच परिसरात इतरत्र ठिकाणी आणखी दोन वाघाचे बछडे मृतावस्थेत आढळून आले. त्यातील एक बछडा हा नर असून दुसरा बछडा कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने त्याचे लिंग स्पष्ट झालेले नाही. पंचनामा करून वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये प्राथमिक वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत वाघाच्या बछड्याचे शव ताब्यात घेऊन वन्यजीव उपचार केंद्रात त्यांचे शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन पोडचलवार व बल्लारशाचे पशुधन विकास अधिकारी डॉ. दिलीप जांभुळे यांनी केले. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण सांगता येईल अशी माहिती सूत्रांनी दिली. सदर प्रकरणाचा तपास वनपरिक्षेत्राधिकारी नरेश भोवरे करीत आहेत.