पाकिस्तानमधील पेशावरच्या एका मशिदीत आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला आहे. या घटनेत २८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर, १५० जण जखमी झाले आहेत. बॉम्बस्फोटामुळं मशिदीचा एक भाग जमीनदोस्त झाल्याचं सांगण्यात आलं आहे. पेशावरमधील पोलीस लाइन्स जवळील मशिदीत जोहारच्या नमाजानंतर बॉम्बस्फोट झाला.
पेशावरच्या लेडी रीडिंग हॉस्पिटलचे प्रवक्ते मोहम्मद असीम यांनी पाकिस्तानी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं ते म्हणाले.
पाकिस्तानी सुरक्षा दलांकडून नाकेबंदी करण्यात आली आहे. रुग्णवाहिकांना रुग्णालयात पोहोचण्यासाठी रस्ता इतर वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. पोलीस अधिकारी सिंकदर खान यांनी इमारतीचा एक भाग कोसळल्याचं सांगितलं. त्याखाली लोक अडकले असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.