बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खान (२७ डिसेंबर) आपला ५७वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास निमित्ताने काल (२६ डिसेंबर) सलमान खानच्या घरी जंगी प्री-बर्थडे पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीला बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती.यावेळी सगळेच सेलिब्रिटी काळ्या रंगाचे कपडे परिधान करून आले होते. तर, स्वतः सलमान खान देखील आपल्या सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यासह आला आणि त्याने केक कापून पापाराझींचे आभार देखील मानले. या वेळी सलमान खान देखील काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये हँडसम दिसत होता.
अभिनेता सलमान खान याच्या या बर्थडे पार्टीत अभिनेत्री तब्बू आणि सई मांजरेकर सहभागी झाल्या होत्या. या पार्टीला सलमानची बहीण आर्पिता पती आयुष शर्मा याच्यासोबत एकत्र फोटो पोज देताना दिसली. या सोबतच कार्तिक आर्यन आणि निर्माता रमेश तौरानी देखील या पार्टीत सहभागी झाले. संगीता बिजलानी, सोनाक्षी सिन्हा, सुनील शेट्टी, रितेश देशमुख, जेनेलिया डिसूझा आणि युलिया वंतूर देखील सलमानच्या या जंगी सेलिब्रेशनमध्ये सामील झाले.
सलमान खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ‘बॉलिवूड किंग’ शाहरुख खान देखील या पार्टीत सामील झाला होता. रात्री उशीराने सलमानच्या घरी पोहोचलेला शाहरुख खान गाडीतून उतरताच थेट आत जाऊन सलमान खानला भेटला. यानंतर दोघांनी एकत्र बाहेर येऊन पापाराझींच्या कॅमेरासाठी फोटो पोज दिल्या. सलमानच्या बर्थडे पार्टीतले हे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आले आहेत.
‘दबंग’ अभिनेता सलमान खान आज (२७ डिसेंबर) ५८व्या वर्षांत पदार्पण करत आहे. या खास दिवशी, त्याचे चाहते, मित्र आणि कुटुंबातील सदस्य त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. सलमान खानला बॉलिवूडमध्ये आपली कारकीर्द सुरू करून आता ३० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र, आजही त्याच्या स्टाईलचे करोडो लोक दिवाने आहेत. लवकरच तो ‘टायगर ३’ आणि ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.