ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा पुरुषांच्या भाला फेकीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर पोहोचला आहे. कारकिर्दीत प्रथमच त्याने अव्वल क्रमांक गाठला आहे. या क्रमवारीत नीरज १४५५ गुणांसह अव्वल आहे. ग्रेनडाचा अँडरसन पीटर्स १४३३ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर टोकियो ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेता चेक प्रजासत्ताकचा जॅकुब वादलेच १४१६ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. २५ वर्षीय नीरज गेल्या वर्षी ३० ऑगस्टला जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला होता. त्या वेळी पीटर्स अव्वल क्रमांकावर होता. यंदाच्या मोसमात नीरजने दोहा डायमंड लीगमध्ये ८८.६७ मीटर कामगिरी नोंदवून सुवर्णपदक मिळवले होते.
नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. चोप्राने ७ ऑगस्ट २०२१ रोजी हा करिष्मा केला. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा तो पहिला ट्रॅक आणि फील्ड अॅथलीट ठरला. एवढेच नाही तर भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा तो दुसरा वैयक्तिक खेळाडू ठरला. २५ वर्षीय नीरजने तिथूनच सगळ्यांचा चर्चेचा विषय ठरला. स्टॉकहोम येथे झालेल्या डायमंड लीगमध्ये नीरजच्या नावावर ८९.९४ मीटर फेकण्याचा विक्रमही नोंदवला गेला आहे.
नीरज चोप्राने सप्टेंबर २०२२ मध्ये स्वित्झर्लंडमध्ये खेळली गेलेली डायमंड लीग स्पर्धा जिंकली. दोहा येथे नुकत्याच खेळलेल्या डायमंड लीगचाही तो चॅम्पियन होता. नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८८.६७ अशी भालाफेक केली. यानंतर कोणीही त्याच्याइतका भाला फेकू शकला नाही. यासह, नीरज आता २०२३ च्या मोसमातील पुढील स्पर्धा हेंगलो, नेदरलँड येथे खेळणार आहे. ४ जूनपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेचे नाव आहे फॅनी ब्लँकर्स-कोएन गेम्स. त्याचवेळी, या स्पर्धेनंतर १३ जूनपासून नीरज फिनलंडमधील तुर्कू येथे होणार्या नूरमी गेम्समध्ये दिसणार आहे.