‘देशात जितक्या वाईट गोष्टींची चर्चा होते, त्यापेक्षा 40 पट अधिक चांगल्या गोष्टी घडत आहेत. याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन चांगला असायला हवा असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज, गुरुवारी केले. नागपुरातील स्नेहांचल या कर्करोग रुग्णांच्या वेदना उपशमन केंद्रात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी सरसंघचालक म्हणाले की, जगाच्या इतर भागा आणि भारत यांच्या सेवेच्या संकल्पनेत फरक आहे. भारताबाहेरील जगात सेवेच्या मागे करूणा आणि दयेची भावना असते. भारतात सेवेच्या मागे क्लेश हरणाचा भाव असतो. मानवी जीवनात जन्मापासून विविध प्रकारचे क्लेश येत असतात. हे असले क्लेश हरण्याचे काम स्नेहांचल करीत आहे. या सेवेत आपुलकीची भावना असल्याचे सरसंघचालकांनी सांगितले. वक्ता असले म्हणजे प्रत्येक ठिकाणी बोलणे गरजेचे नाही तसे जिथे काम सुरुय तिथे सांगण्याची गरज आहे. सेवा करताना आपणही पवित्र होतो. अहंकार आला तर सेवा राहत नाही असे भागवत म्हणाले.