अमेरिकेची विमान निर्माता कंपनी बोईंगने भारतीय लष्करासाठी 6 अपाचे अटॅक हेलिकॉप्टरचे उत्पादन सुरू केले आहे. बोईंगने 2020 मध्ये एएच-64ई मॉडेलची 22 अपाचे हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलाला दिली आहेत. यानंतर भारतीय सैन्याने बोइंग कंपनीसोबत 6 अतिरिक्त हेलिकॉप्टर तयार करण्याचा करार केला आहेच. आगामी 2024 पर्यंत सर्व हेलिकॉप्टर्स दिली जाणार आहेत.
एएच64ई अपाचे हे जगातील सर्वात प्रगत मल्टी कॉम्बॅट हेलिकॉप्टर आहे. यामध्ये उच्च दर्जाची नाईट व्हिजन यंत्रणा आहे, त्यामुळे अंधारातही शत्रूचा शोध घेता येतो. हे हेलिकॉप्टर क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे आणि एका मिनिटात 128 लक्ष्यांवर मारा करू शकते. हेलिकॉप्टर मोठ्या प्रमाणात शस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे. ताशी 280 किमी वेगाने ते उड्डाण करू शकते. हेलिकॉप्टरमध्ये 16 अँटी-टँक एजीएम-114 हेलफायर आणि स्ट्रिंगर क्षेपणास्त्रे बसवण्यात आली आहेत. हेलफायर क्षेपणास्त्र रणगाडे, तोफ, बीएमपी वाहनांसारखे कोणतेही वाहन झटक्यात नष्ट करू शकते. त्याचवेळी स्ट्रिंगर क्षेपणास्त्र हवेतून येणाऱ्या कोणत्याही धोक्याचा सामना करण्यास सक्षम आहे. यासोबतच हे हायड्रा-70 अनगाइडेड क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे जे जमिनीवरील लक्ष्य नष्ट करू शकते.
















