भारतीय कफ सिरपमुळे ६५ बालकांचा मृत्यू झाल्यानंतर कंपनी अडचणीत आली आहे. या प्रकरणी खटला उभा राहिला असून सरकारी वकिलांनी काही गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे भारतीय कंपनी वादात सापडली आहे.
ताश्कंद: उझबेकिस्तानमध्ये भारतीय कफ सिरपमुळे ६५ मुलांचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात आता धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. भारतीय कफ सिरप वितरकांनी अनिवार्य चाचण्यांपासून सवलत मिळावी यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना ३३ हजार डॉलरची (जवळपास २८ लाख) लाच दिल्याचा गंभीर आरोप उझबेकिस्तानच्या सरकारी वकिलांनी केला.
मध्य आशियात येणाऱ्या उझबेकिस्तानमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या मृत्यू प्रकरणी २१ जणांविरोधात खटला चालवण्यात येत आहे. त्यात २१ उझबेकी आणि एका भारतीय नागरिकाचा समावेश आहे. प्रतिवाद्यांमध्ये तीन (एक भारतीय आणि दोन उझबेकी) नागरिक कुरामॅक्स मेडिकलचे अधिकारी आहेत. ही कंपनी उझबेकिस्तानात भारताच्या मॅरियन बायोटेकच्या औषधांची विक्री करते.
सरकारी वकील सॅदकरीम अकिलोव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरामॅक्सचे सीईओ सिंह राघवेंद्र प्रतार यांनी सरकारी अधिकाऱ्यांना ३३ हजार अमेरिकन डॉलरची लाच दिली. कफ सिरपसाठी अनिवार्य असलेल्या चाचण्या होऊ नयेत यासाठी ही लाच दिली गेली. भारतीय कफ सिरपच्या उझबेकिस्तानमध्ये चाचण्या झाल्या की नाहीत, ते मात्र सरकारी वकिलांच्या विधानांमधून स्पष्ट झालेलं नाही.
या प्रकरणी प्रतार यांनी न्यायालयात आपली बाजू मांडली. त्यांनी त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळले. एका मध्यस्थामार्फत अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी रक्कम दिल्याचं मात्र त्यांनी मान्य केलं. त्या पैशांचा वापर कोणी केला आणि कसा केला, याची कल्पना नसल्याचं प्रतार म्हणाले. २१ प्रतिवाद्यांपैकी सात जण कोणत्या ना कोणत्या प्रकरणात दोषी ठरवले गेले आहेत. चोरी, बोगस औषधांची विक्री, कार्यालयाचा दुरुपयोग, बेजबाबदारपणा, लाचखोरी, कटकारस्थान अशा गुन्ह्यांमध्ये ते दोषी आढळले आहेत.