मंद्रूप येथील शेतकऱ्यांना रस्त्यावर हा सण साजरा करण्याची वेळ! राज्यात सर्वत्र गुढीपाडव्याचा उत्साह दिसून येतोय. सर्वत्र आपल्या घरावर गुढी उभारून नागरिक गुढीपाडव्याचा सण साजरा करत आहेत. मात्र मंद्रूप येथील शेतकऱ्यांना रस्त्यावर हा सण साजरा करण्याची वेळ आली आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील शेतकरी आपल्या सातबारा वरील एमआयडीसीचा शेरा कमी व्हावा या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. अनेकांनी आश्वासन देऊन मागणी मान्य न झाल्याने या शेतकऱ्यांनी मंद्रूप ते मुंबई बैलगाडी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. मात्र सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत काही दिवसातच उतारा कोरा करण्याचे आश्वासन दिल्याने या शेतकऱ्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातच आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. आज गुढीपाडवा असल्याने आंदोलन ठिकाणी या शेतकऱ्यांनी आपल्या बैलगाड्यांवरती गुढी उभारून सण साजरा केला. घरात ज्या पद्धतीने गोडंधोड स्वयंपाक करून सण साजरे केले जातात तशाच पद्धतीने रस्त्यावर चूल मांडून खीर, पोळी, भाजी असा स्वयंपाक देखील या ठिकाणी करण्यात आला.
आम्हाला दिवाळी देखील रस्त्यावर साजरी करावी लागली होती, आता पाडवा देखील रस्त्यावर साजरा करावा लागत आहे ही मोठी खंत आहे. शासनाने आमच्या सातबारे कोरे करावेत अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली