२००८ मधील एका प्रकरणात मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात जारी करण्यात आलेले अजामीनपात्र वॉरंट परळी न्यायालयाकडून रद्द करण्यात आले आहे. आज परळी कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झाली. या सुनावणीसाठी राज ठाकरे स्वत: उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटले की, कोरोनाची साथ असल्यामुळे मध्यंतरी राज ठाकरे यांना सुनावणीसाठी हजर राहता आले नाही. न्यायालयाने दुसरे अटक वॉरंट जारी केले तेव्हा राज ठाकरे हे रुग्णालयात होते. त्यामुळे त्यांना सुनावणीसाठी उपस्थित राहता आले नाही. परळी न्यायालयाने त्यांचा हा युक्तिवाद मान्य करत राज ठाकरे यांच्याविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात आले. हे वॉरंट रद्द करताना न्यायालयाने राज ठाकरे यांना ५०० रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ जानेवारीला होईल.
दरम्यान, राज ठाकरे आज सुनावणीसाठी परळी कोर्टात येणार असल्याने याठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. राज ठाकरे हेलिकॉप्टरने मुंबईहून थेट परळीला गेले. याठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. हेलिपॅडवर उतरल्यानंतर राज ठाकरे यांनी हुरडा खाण्याचा आनंद लुटला. त्यानंतर राज ठाकरे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन समाधीचे दर्शन घेतले. तेथून राज ठाकरे थेट परळी कोर्टाकडे रवाना झाले होते.
राज ठाकरे परळी न्यायालयात आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी मनसे कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. याशिवाय, राज यांना पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांचीही मोठी गर्दी झाली होती. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ‘राज ठाकरे जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. बराच काळ घोषणाबाजी सुरु होती. यामुळे न्यायाधीश चिडले. अखेर कार्यकर्त्यांच्या गराड्यातून वाट काढत राज ठाकरे न्यायालयाच्या आतमध्ये पोहोचले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांचाच युक्तिवाद झाला आणि राज ठाकरे यांच्याविरोधातील अटक वॉरंट रद्द करण्यात आले.
राज ठाकरे यांनी परळी कोर्टात जाण्यापूर्वी गोपीनाथ गडाला भेट दिली. गोपीनाथ गड हा पांगरी ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात येतो. या गावचे सरपंच सुशील कराड यांनी राज ठाकरे यांच्यासाठी ५० फुटांचा हार तयार केला होता. त्यांनी राज यांचे जंगी स्वागत केले. सुशील कराड हे धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत. तत्पूर्वी राज ठाकरे यांचे हेलिकॉप्टर इंधन भरण्यासाठी औरंगाबाद शहरानजीक पळशी गावात थांबले होते. तेव्हा राज ठाकरे हेलिपॅड जवळच असलेल्या रिसॉर्टवर हुरड्याचा आस्वाद घेण्यासाठी गेले होते.