मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात सुरू केलेले उपोषण मनोज जरांगे यांनी आज, गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर 17 व्या दिवशी मागे घेतले आहे. यावेळी मुख्यंमत्री शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांची देखील उपस्थिती होती. शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.
मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतले असले तरी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी सरकारला एक महिन्याचा वेळ दिला आहे. त्यामुळे या काळात आपण आपले आमरण उपोषण देखील मागे घेणार असल्याचे जरांगे म्हणाले होते. मात्र, मुख्यंमत्री शिंदे यांच्या हस्तेच आपण उपोषण मागे घेणार असल्याची त्यांची भूमिका होती. त्यामुळे अखेर आज, गुरुवारी मुख्यंमत्री शिंदे अंतरवाली गावात दाखल झाले. त्यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मुख्यंमत्री यांच्या विनंतीनंतर जरांगे यांनी आपले बेमुदत उपोषण मागे घेतले. विशेष म्हणजे बेमुदत उपोषण मागे घेतले असले तरीही साखळी उपोषण मात्र सुरूच राहणार असल्याचे जरांगे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.