गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवर्यात अडकलेले महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीशकुमार शुक्ल यांनी आज सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रा. शुक्ल यांचा राजीनामा मंजूर केला.
कुलगुरू प्रा. रजनीशकुमार शुक्ल यांच्यावर महिलेच्या शोषणाचे आरोप होत होते. सोशल मीडियावर यासंदर्भातील चॅट व्हायरल झाल्यानंतर कुलगुरू शुक्ल यांच्यासह विद्यापीठाचीही खूप बदनामी झाली होती. विद्यार्थ्यांनी आठवडाभरापासून कुलगुरूंच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू होते. याप्रकरणी कुलगुरू प्रा. शुक्ल यांनी 11 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेऊन आरोपांचे खंडण केले होते. मात्र, सततची बदनामी आणि विद्यार्थ्यांचे सुरू असलेले आंदोलन या दुहेरी समस्येत अडकलेले कुलगुरू प्रा. शुक्ल यांनी अखेर सोमवारी आपल्या पदाचा दिला. कुलगुरूंच्या राजीनाम्याचा परिणाम विद्यापीठाच्या कामकाजावर होऊ नये, यासाठी विद्यापीठातील प्रा. एल. कारूण्यकरा यांना कुलगुरू पदाचा तात्पुरता प्रभार सोपवण्यात आल्याचे कुलसचिव कादर नवाज खान यांनी सांगितले.