तभा वृत्तसेवा,
सोलापूर, दि. १३ ऑक्टोबर –
महापालिकेतील 131 रोजंदारी कामगारांना कायम करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच स्वाक्षरी केली आहे. यामुळे हे रोजंदारी कर्मचारी आता कायम होणार आहेत. दरम्यान, हे वृत्त समजताच महापालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीने महापालिका आवारात एकच जल्लोष साजरा करण्यात आला.
सोलापूर महापालिकेतील 131 रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्याचा प्रश्न गेल्या 14 वर्षापासून प्रलंबित होता. महापालिका प्रशासनाकडून याबाबतचा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे पाठवण्यात आला होता. अखेर या प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल बुधवारी स्वाक्षरी केली आहे, याची माहिती आमदार प्रणिती शिंदे यांनी कामगार नेते अशोक जानराव यांना कळवली.
हे वृत्त समजताच कामगार नेते अशोक जानराव यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. त्याचबरोबर महापालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीने मुंबई येथे जाऊन रोजंदारी कामगारांना कायमच्या ऑर्डरी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापालिका हिरवळीवर द्याव्यात अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे प्रत्यक्ष करणार असल्याचे कामगार नेते अशोक जानराव यांनी सांगितले. महापालिकेच्या 3100 पैकी 131 रोजंदारी कामगारांना कायम करण्याचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित होता. दिनांक 26 ऑक्टोबर 1995 रोजी महापालिका सभागृहात महापालिका सभेत केलेल्या ठरावानुसार पालिकेतील रोजंदारी कामगारांना टप्प्याटप्प्याने कायम करण्यात येत होते. त्यापैकी 131 रोजंदारी कामगार सेवेत कायम करण्याचा प्रश्न प्रलंबित होता. अखेर बुधवारी मुख्यमंत्र्यांनी त्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे. कृती समितीच्या माध्यमातून यासाठी पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश आले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केले आहे. तेव्हा या पुढील कार्यवाही महापालिका आयुक्तांनी करावी अशी विनंती ही करणार असल्याचे कामगार नेते अशोक जानराव यांनी सांगितले.
यावेळी कामगार नेते चांगदेव सोनवणे , सरचिटणीस प्रदीप जोशी, अजय शिरसागर यांच्यासह पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापालिका आवारात कर्मचाऱ्यांचा जल्लोष
रोजंदारी कामगारांना कायम करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी सही केल्याबद्दल सोलापूर महापालिका आवारात महापालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीने कामगार नेते अशोक जानराव यांच्या नेतृत्वाखाली आनंदोस्तव साजरा करण्यात आला. गुलालाची मुक्त उधळण करीत हलगीच्या कडकडात घोषणा देण्यात आल्या. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.