हैदराबाद: विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून तेलंगणात राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. पोलिसांनी राज्यभरात अधिक कुमक कामाला लावली आहे. गैरप्रकार टाळण्यासाठी पोलिसी यंत्रणा सतर्क आहे. त्यातच गडवालमध्ये मंगळवारी रात्री राष्ट्रीय महामार्गावर एका ट्रकची तपासणी केली असता, त्यात ७५० कोटी रुपयांची रोकड सापडली.
गडवालमधून जाणाऱ्या महामार्गाचा वापर अनेकदा तस्करीसाठी होतो. तशा घटना या मार्गावर बऱ्याचदा उघडकीस आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रकमध्ये तब्बल ७५० कोटींची रोकड सापडल्यानं एकच खळबळ उडाली. पोलिसांनी चौकशी केली. ट्रक चालकाकडे कागदपत्रांची मागणी केली. ट्रकमधील रक्कम युनियन बँक ऑफ इंडियाची असल्याचं आणि ती केरळहून हैदराबादला नेली जात असल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर प्रकरण निवळलं.
निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यानंतर ट्रकमध्ये तब्बल ७५० कोटी सापडल्यानं विविध प्रकारच्या अफवा पसरल्या. चर्चांना उधाण आलं. यानंतर तेलंगणाचे मुख्य निवडणूक अधिकारी विकास राज यांनी सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला. बँक अधिकाऱ्यांनी कागदपत्रं दाखवल्यानंतर ट्रक पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाल्याची माहिती राज यांनी दिली. ‘७५० कोटी घेऊन जाणारा ट्रक काही तास चर्चेत होता. ट्रकमधील रक्कम बँकेची असल्याचं काही तासांत आम्हाला समजलं. याबद्दलचा अधिकृत तपशील, कागदपत्रं मिळाल्यानंतर पोलिसांनी ट्रक सोडला,’ असं राज म्हणाले.
सरकारी यंत्रणा राज्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करत आहेत, असं राज यांनी सांगितलं. निवडणूक तारखांची घोषणा करण्यापूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना गोवा आणि अन्य ठिकाणांहून मेहबूबनगरहून हैदराबादमार्ग होणाऱ्या तस्करीला चाप लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. राज्य पोलिसांकडून अपेक्षित कामगिरी होत नसल्यानं त्यांनी नाराजी दर्शवली. विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी वरिष्ठ आयपीएस अधिकारी, चार जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या.