अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. पुढे त्यांनी राजीनामा दिला आणि EDने त्यांना अटक केली. फेब्रुवारी 2021 मध्ये मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानासमोर स्फोटकांनी भरलेली एक चारचाकी गाडी आढळून आली होती. तेव्हाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण विधानसभा अधिवेशनात उपस्थित केल्यानंतर राज्यासह देशाचं लक्ष याकडे वेधलं गेलं. त्यानंतर घडलेल्या घडामोडींमधून अँटिलिया स्फोटक प्रकरणाचे धागेदोरे सुरुवातीला मुंबई पोलिसांतील गुन्हे शाखेतील अधिकारी सचिन वाझे, पुढे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि नंतर खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापर्यंत जाऊन पोहोचले. अखेरीस वाझे यांचं निलंबन-अटक, सिंह यांची बदली-गयब आणि देशमुख यांच्या राजीनामा ते अटक या घडामोडींनी हे प्रकरण गाजलं होतं.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रूपयांची खंडणी वसूल करण्याचा आरोप केला होता. त्यानंतर, कोर्टाच्या आदेशाने सीबीआयने गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली. ईडीने या प्रकरणी मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल करून अनिल देशमुख यांचे दोन स्वीय सहाय्यक सचिन संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक केली.ईडीने अनिल देशमुख यांना या प्रकरणी प्रमुख आरोपी म्हटलं होतं. त्यानंतर अनिल देशमुख यांची 4 कोटी रूपयांची संपत्ती जप्त करण्यात आली होती.दरम्यान, सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करा अशी अनिल देशमुख यांची याचिका हाचकोर्टाने फेटाळून लावली होती.बार मालकांकडून गोळा करण्यात आलेला पैसा हवालामार्फत दिल्लीहून नागपूरला देशमुख यांच्या टृस्टमध्ये जमा झाला असा ईडीचा आरोप आहे.
या प्रकरणी अनिल देशमुख यांच्या मुलालाही ईडीने समन्स बजावलं होतं.मनीलॅाडरिंग प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याला अनिल देशमुख यांनी सुरुवातीला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. आपल्याविरोधात कोणतीही अटकेची (coercive) कारवाई करू नये, अशी मागणी त्यांनी सुप्रीम कोर्टातील याचिकेत केली होती.16 ॲागस्ट 2021 रोजी सुप्रीम कोर्टाने अनिल देशमुख यांनी मागणी फेटाळून लावत, त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांची रवानगी तुरुंगात झाली होती.