शभरातील ट्रकचालक हा संपूर्ण वाहतुकीसाठीचा मोठा कणा आहे. मालवाहतुकीमुळेच देशभरातील विविध उद्योगधंदे, व्यवसाय चालतात. परंतु अलिकडच्या काळात मोटार मालक, चालक, कामगार, वाहतूकदार यांची वाहतूक पोलीस, आरटीओ तसेच सरकारकडून आर्थिक पिळवणूक करण्यात येत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी मोटार मालक कामगार वाहतूक संघटनेच्या वतीने विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. या संदर्भात मोटार मालक वाहतूक कामगार संघटनेचे अध्यक्ष सचिन जाधव यांनी पत्रकारांना माहिती दिली.
यावेळी सचिन जाधव यांनी ट्रक चालकांच्या विविध समस्या मांडल्या. तसेच केंद्र आणि राज्य सरकारने या समस्या तातडीने सोडवून त्यांच्या मागण्या बाबत कारवाई करावी, असे सांगितले. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस, नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमृतलाल मदान तसेच माजी उपाध्यक्ष विजय कालरा यांना मोटार मालक कामगार वाहतूक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
या निवेदनात मागणी करण्यात आली आहे की, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या पाठपुराव्यामुळे मध्यप्रदेश मधील आरटीओ चेकपोस्ट १३ चेक पोस्ट बंद करण्यात आले आहेत. तसेच दि. १४ डिसेंबर २०२३ पर्यंत एकूण ४७ चेक पोस्ट बंद करण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारने घेतला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील चेक पोस्ट बंद करण्यासाठी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने पाठपुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ट्रॅफिक पोलीस व हायवे पोलीस यांच्याद्वारे ऑनलाइन चालन कारवाईचा ट्रकचालक व वाहतूकदारांना त्रास होत असतो, हा त्रास कमी करण्यासाठी प्रयत्न करावे, अशा प्रकारचे निवेदन यावेळी देण्यात आले.
यावेळी अमृतलाल मदान, विजय कालरा, राकेश तिवारी, सी.एल. मुकाती, राजेंद्र त्रेहान यांचा मोटार मालक कामगार वाहतूक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अमृतलाल मतदान यांनी सांगितले की, केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशभरातील चेक पोस्ट बंद करण्यासाठी आपण केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करू.