गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर लगेच ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मीचा सण आला. त्यामुळे बाजारात वेगवेगळ्या फुलांची मागणी वाढली आहे. एरवी ५० रुपयाला मिळणारा हार आता १०० ते १५० रुपयाला तर महालक्ष्मी पूजनासाठी लागणारे हार दीड हजारपासून ३ हजार रुपयांपर्यंत विकले जात आहेत. सर्वच फुले ही शंभर रुपये किलोच्यावर आहेत.
महालक्ष्मीची आज महापूजा आहे. त्यामुळे शहरातील जवाहर गेट भागातील फूल बाजारात लोकांची सकाळपासून गर्दी वाढली. पावसामुळे फुले खराब झाली असून बाहेरून येणाऱ्या फुलांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे हारांचे भाव वाढले आहेत. निशिगंध, झेंडू, गुलाब यासह विविध फुलांचे हार घेण्यास नागरिक पसंती देतात. दोन मोठे हार आणि दोन लहान हाराची किंमत दीड हजारापासून ते तीन हजार रुपयापर्यंत असल्याचे फूल विक्रेता यांनी सांगितले.
शहरातील अनेक ठिकाणी फुलांची दुकाने आहेत. महालक्ष्मी सणाला फुलांचे महत्त्व आहेच. सजावट करण्यासाठी फुले घ्यावीच लागतात. काल परवा एवढा भाव नव्हता, आज फुलांच्या हाराला दीड ते दोन रुपये जोडी असा भाव असल्याचे विजय वंजारी यांनी सांगितले, शेवंती, गुलाब, मोगरा, निशिगंध (गुलछडी), लिली, जुई, जरबेरा आणि चमेलीच्या फुलांना मागणी आहे.