नायर वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृह येथे ओणम सणाच्या निमित्ताने आणि असोसिएशनला ३५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला आज खा. श्रीकांत शिंदे उपस्थित होते. यावेळी सर्वांना ओणम सणाच्या शुभेच्छा देऊन नायर वेल्फेअर असोसिएशनच्या सदस्यांचे अभिनंदन केले. यावेळी उपस्थितांशी त्यांनी आवर्जून संवादही साधला.
ते म्हणाले की, आपल्या देशात महाराष्ट्र हे असे एकमेव राज्य असावे जिथे विविध जाती – धर्माचे लोक एकत्रित आनंदाने नांदतात. ही आपल्या राज्याची खऱ्या अर्थाने ओळख आहे. माझा कल्याण लोकसभा मतदारसंघदेखील एक प्रतीकात्मक भारतच आहे. मतदारसंघातील विविध शहरांमध्ये मराठी, आगरी, कोळी, मुस्लिम, दाक्षिणात्य राज्यातील तसेच राजस्थान अशा विविध प्रांतांतील लोक अगदी गुण्यागोविंदाने राहत असल्याचे यावेळी सांगितले. गुढीपाडवा हा सण मराठी बांधवांसाठी जितका महत्त्वाचा असतो त्याच पद्धतीने ओणम सण हा केरळ आणि इतर दाक्षिणात्य राज्यांतील नागरिक उत्साहाने साजरे करतात. याच पद्धतीने आपण आपले सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करायला हवे. सणांच्या माध्यमातूनच आपण आपली परंपरा, संस्कृती आणि धर्म जपत असतो.
या आधीच्या सरकारच्या काळात उत्सव साजरे करण्यावर अनेक निर्बंध लावण्यात आले होते. मात्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार येताच आपण सर्व सणांवरील निर्बंध हटविले. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र यांसारखे अनेक उत्सव आता जल्लोषात साजरे होत आहेत, असेही यावेळी आवर्जून सांगितले. मुख्यमंत्री महोदयांचे केरळ समेवत एक अनोखे नाते आहे. ज्या वेळी केरळ मध्ये पूरस्थिती उद्भवली होती त्यावेळेस साहेबांनी केरळवासियांसाठी मोठे मदतकार्य राबविले होते. असेही यावेळी सांगितले. नायर वेल्फेअर असोसिएशन गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण डोंबिवली या ठिकाणी मोठे कार्य करत आहे. एक समाज एकजुटीने बांधून ठेवण्याचे उत्तम कार्य ही संस्था करत असल्याचे यावेळी मत व्यक्त केले. याप्रसंगी केरळच्या पारंपरिक भोजनाचा आनंद घेतला.
या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून व्ही.जी.थंपी उपस्थित होते. याबरोबरच शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, युवासेना सचिव दीपेश म्हात्रे, नायर वेल्फेअर असोसिएशनचे, प्रेसिडेंट के. वेणुगोपाल, जनरल सेक्रेटरी मधू बालक्रीष्णन यांच्या समवेत असोसिएशनचे अनेक मान्यवर मंडळी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.