छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात मांडलेल्या भूमिकेवर मी ठाम आहे. माझी प्रत्येक भूमिका सगळ्यांना पटेलच असं नाही आणि माझी भूमिका चुकीची ठरवणारे हे कोण? असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपला विचारला आहे. ते आज पुणे दौऱ्यावर आहेत. माध्यामांशी बोलताना त्यांनी हा सवाल उपस्थित केला आहे.
अजित पवार म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराजांबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. मी कधीच महापुरुषांबाबात चुकीचं वक्तव्य केलेलं नाही. माझा राजीनामा मागण्याचा अधिकार भाजपला नाही.” “मी भूमिका स्पष्ट केली आहे त्यामुळे हा विषय वाढवण्याची आता गरज नाही. लोकांच्या अनेक समस्या आहेत. त्याकडे लक्ष द्यायला हवं. राष्ट्रवादीची स्थापना स्वाभिमानासाठी झाली. आम्ही पुरोगामी विचार मानणारे लोक आहोत. कॉंग्रेसमध्ये असताना देखील सर्वधर्मसमभाव असाच विचार होता. त्यावेळीही दुजाभाव केला नाही. वडीलधाऱ्यांनी आपल्यावर जे संंस्कार केले आहेत. त्याला कुठेही धक्का न लागता आतापर्यंत काम केलं आहे. माझी भूमिका सगळ्यांना पटली पाहिजे असा माझा आग्रह नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
गाड्यांवर लावले स्टिकर्स
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा स्वराज्यरक्षक उल्लेख असणार स्टिकर्स वाहनांवर लावले आहेत. संभाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर आज पहिल्यांदाच अजित पवार पुण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांचं गंजी स्वागत देखील केलं आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्यरक्षक म्हणायचं की धर्मवीर म्हणायचं यावरुन अजित पवारांना धारेवर धरण्यात आलं होतं. त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण पेटलं होतं. मात्र या सगळ्या वादानंतर आज पहिल्यांदाच अजित पवार पुण्यात आले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संभाजी महाराजांचा स्वराज्यरक्षक उल्लेख असणारे स्टिकर्स छापण्यात आले आहेत. प्रत्येक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर हे स्टिकर्स लावण्यात येणार आहेत. अजित पवार यांनी एका गाडीला स्टिकर लावलं आणि बाकी कार्यकर्त्यांना स्टिकरचं वाटपही केलं. हे स्टिकर्स पक्षाचे आजी माजी आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांसह सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटण्यात येणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते त्याच्या वाहनांवर, घरांवर आणि इतर ठिकाणी लावणार आहेत. त्याचबरोबर महापालिकेसाठी इच्छूक उमेदवारांनाही मतदारांपर्यंत हे स्टिकर्स पोहोचवण्यासाठी देण्यात येणार आहेत.
आमच्या दहा पिढ्या छत्रपतींचा अपमान करणार नाही
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जिवंत असेपर्यंत आमच्याकडून होणार नाही आणि आमच्या दहा पिढ्याही त्याचा अपमान होईल, असं वक्तव्य करणार नाहीत. त्यामुळे विरोधकांनी यासंदर्भात कोणतंही नवं राजकारण करु नये आणि राजकारण गढूळ करण्याचाही प्रयत्न करु नये, असंही ते म्हणाले.