भारताच्या राष्ट्रीय विक्रमधारक आणि आशियाई चॅम्पियन ‘माणदेशी एक्सप्रेस’ म्हणजेच, धावपटू ललिता शिवाजी बाबरने आजपर्यंत अनेक पदकांवर आपलं नाव कोरलं आहे. तिची ही अतुलनीय कामगिरी जगासमोर आणणारा ‘ललिता शिवाजी बाबर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘ललिता शिवाजी बाबर’ या चित्रपटाच्या निमित्ताने एंडेमॉल शाईन इंडिया मराठीत पदार्पण करत आहेत.
ललिता शिवाजी बाबरची भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकर साकारणार असून तिचा हा पहिलाच बायोपिक आहे. काल (26 जानेवारी) प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ‘ललिता शिवाजी बाबर’ या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले. पुढील वर्षी म्हणजेच 26 जानेवारी 2024 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
‘ललिता बाबर’ची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल अमृता खानविलकर म्हणते, ‘एक अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणे, ज्यांनी आपल्या देशाचे नाव जागतिक स्तरावर नेले आहे. याहून अधिक आनंदाची गोष्ट असूच शकत नाही. ऑलिंपिक ट्रॅकच्या अंतिम फेरीत पोहोचणारी भारतातील ती पहिल्या धावपटू आहे. तिच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंदही आहे. अशा मोठ्या व्यक्तिमत्वाची भूमिका साकारण्याचा सर्वोच्च मान मला मिळाला आहे आणि याचा खूप आनंद आहे. मागील दीड वर्षांपासून मी ललिता बाबरच्या संपर्कात आहे. तिची देहबोली, त्यांचा स्वभाव, त्यांचा सराव, एक व्यक्ती म्हणून त्यांचे वावरणे, या सगळ्या बारकाव्यांचा मी अभ्यास करतेय.’
अमृता खानविलकरनं सोशल मीडियावर या चित्रपटाचं पोस्टर शेअर केला आहे. अमृतानं हे पोस्टर शेअर करुन त्याला खास कॅप्शन दिलं आहे.