माहूर / नांदेड – आमदारकी मेहकर (विधानसभा) आणि खासदारकी (बुलढाणा लोकसभा) दोन्हीची हॅटट्रिक करण्याचा पराक्रम साधणारे शिवसेनेचे मातब्बर नेते केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारत सरकार ना. प्रतापराव गणपतराव जाधव यांनी आज माहूरगडावर देवदर्शनानिमित्त भेट दिली.
यावेळी माहूर येथे ५० खाटांचे शासकीय रुग्णालय मंजूर करावे, अशी मागणी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे केली असता जागेची उपलब्धता असल्यास माहूर येथे ३० बेडचे आयुष हॉस्पिटल उभारता येईल, असे सकारात्मक आश्वासन मंत्री महोदयांनी दिले आहे.
माहूर शहरासाठी अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरची मागणीच्या पार्श्वभूमीवर तिर्थक्षेत्र म्हणून देवदर्शनासाठी दररोज हजारो भाविकांची ये-जा आणि दुर्गम डोंगराळ कठीण घाट वळणाची भौगोलिक परिस्थिती यामुळे अपघातांचे दिवसेंदिवस वाढत चाललेले लक्षणीय प्रमाण पाहता माहूर येथे रुग्णांना तातडीच्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी ५० खाटांचे शासकीय रुग्णालय मंजूर करावे, अशी मागणी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे केली असता जागेची उपलब्धता असल्यास माहूर येथे ३० बेडचे आयुष हॉस्पिटल उभारता येईल, असे सकारात्मक आश्वासन मंत्री महोदयांनी दिले.
आज दिनांक २३ डिसेंबर रोजी देवदर्शनाच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव माहूर येथे आले असता, स्थानिक विश्रामगृहावर नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी त्यांची भेट घेऊन माहूर तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेची सविस्तर माहिती दिली.माहूर हे जागतिक कीर्तीचे तीर्थक्षेत्र असून शहराची लोकसंख्या सुमारे २५ हजार आहे. तसेच तालुक्यातील ९२ गावांतील सुमारे २ लाख नागरिक व भाविक आरोग्य सेवांसाठी माहूरवर अवलंबून आहेत. सध्या येथे केवळ एकच शासकीय ग्रामीण रुग्णालय असून ते अपुरे पडत आहे.
तालुक्यातील गोरगरीब नागरिकांसह दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तातडीच्या व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी माहूर येथे मोठ्या क्षमतेचे रुग्णालय आवश्यक असल्याचे नगराध्यक्षांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले.
त्यावर मंत्री प्रतापराव जाधव यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, योग्य जागा उपलब्ध झाल्यास माहूर येथे ३० बेडचे आयुष हॉस्पिटल उभारण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील, असे सकारात्मक आश्वासन दिले.
५० बेडचे शासकीय रुग्णालय
…म्हणजे उपजिल्हा रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालय ज्यांची क्षमता ५० खाटांची असते, जिथे डॉक्टर, परिचारिका आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा (जसे की आपत्कालीन सेवा, शस्त्रक्रिया, प्रयोगशाळा) उपलब्ध असतात, जेणेकरून स्थानिक जनतेला आरोग्य सेवा मिळू शकेल आणि जिल्हा रुग्णालयावरील भार कमी होईल, विशेषतः दुर्गम भागात हे रुग्णालये महत्त्वपूर्ण ठरतात.
३० बेडचे आयुष हॉस्पिटल
हे आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी यांसारख्या पारंपरिक उपचार पद्धतींवर आधारित ३० खाटांचे रुग्णालय असून, जे केंद्र-राज्य सरकारच्या मदतीने उभारले जाते आणि रुग्णांना आधुनिक व पारंपरिक उपचारांचा एकत्रित अनुभव देते, ज्यात योग हॉल व आवश्यक सुविधा असतात. ही रुग्णालये रुग्णांच्या सोयीसाठी आणि सरकारी योजनेचा भाग म्हणून उभारली जातात, ज्यात तज्ञ डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची टीम असते.याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे रुग्णालय पारंपरिक भारतीय औषध पद्धतींवर लक्ष केंद्रित करते.आरोग्य सेवा सर्वांपर्यंत पोहोचवणे, विशेषत: ग्रामीण भागात, हा या रुग्णालयांचा मुख्य उद्देश असतो.


























