मुंबईकडून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कशेडी बोगद्यासंदर्भात ही बातमी आहे. या बोगद्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मोठा निर्णय घेतला आहे. बातमी सविस्तर वाचा…
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटाला पर्याय ठरलेल्या कशेडी बोगदा हा तूर्तास गणेशोत्सवासाठी सुरू करण्यात आला होता. आता या बोगद्यातील वाहतूक पुढच्या टप्प्यातील कामासाठी बंद केली जाणार आहे. अनंत चतुर्दशी झाल्यानंतर आता कशेडी बोगद्यातून सुरू करण्यात आलेली वाहतूक पुन्हा एकदा थांबवण्याचा निर्णय घेतला जाणार असून ही वाहतूक नेमकी कधी थांबवली जाते याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. पुढच्या आठवड्यात सुरू करण्यात आलेला कशेडी बोगद्यातील वाहतूक बंद करून पुढील काम सुरू केले जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्याने दिली.
दुसऱ्या मार्गिकेचे काम सुरू असताना वाहतुकीसाठी लागणाऱ्या अवजड सामानाची वाहतूक सध्या सुरू असलेल्या बोगद्यातून करावी लागणार आहे. डिसेंबर २०२३ अखेर कशेडी बोगद्यातील दुसरी मार्गिकाही वाहतुकीसाठी सज्ज करून जानेवारी २०२४ या नवीन वर्षात वाहतूक सुरू करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. हे काम युद्ध पातळीवर पूर्ण होण्यासाठी आणखी एका एजन्सीची मदत या कामासाठी घेतली जाणार आहे, अशीही माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिली आहे.
कशेडी बोगद्यातील मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी दुसरी मार्गिका सुरू करण्यासाठी काम हाती घेतले जाणार आहे. यासाठी सुरू असलेली वाहतूक सुरक्षा म्हणून बंद केली जाणार आहे. मात्र, वाहतूक नेमकी केव्हापासून बंद होईल? याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे. सध्या वाहतूक सुरू करण्यात आलेल्या बोगद्यामध्ये कायमस्वरूपी लाईट व्यवस्था करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. तसेच दुसऱ्या बोगद्याचे काम सुरू करताना या बोगद्यातून सामानाची वाहतूक व्यवस्था केली जाणार आहे.
सुरक्षेसाठी पुढील टप्प्याचे काम करताना या सगळ्याचा विचार करून पुन्हा एकदा आढावा घेऊन सुरू असलेली वाहतूक पुन्हा एकदा काही काळ बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला जाणार आहे.
मुंबईकडे येताना पर्यायी मार्गांचा वापर करा
कोकण व गोव्याकडून मुंबई ठाणे पुणे पालघर या दिशेने जाताना राष्ट्रीय महामार्गावरील पर्यायी मार्गांचा वापर केल्यास हा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. माणगावहून पाली – खोपोली मार्गे – मुंबई – पुणे – ठाणे – पालघरच्या दिशेने जाता येऊ शकते.