पुण्यात डबल डेकर बस धावण्याची शक्यता आहे. पीएमपीएलच्या (पुणे महानगर परिवहन महामंडळ) ताफ्यात पुढील वर्षी येऊ शकतात. पीएमपीएलची नुकतीच एक बैठक पार पडली आणि त्यात पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरीया यांनी याबद्दलची माहिती दिली.मुंबईतील डबल डेकर बसचं पुणेकरांना आकर्षण आहे. पुण्याहून मुंबईत गेलेले नागरिक या बसमधून प्रवास करण्यासाठी उत्सुक असतात. त्याच नागरिकांची उत्सुकता लक्षात घेत पुण्यात “डबल डेकर” बस सुरु होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात प्राथमिक चर्चा देखील झाली आहे.
मुंबईमध्ये डबल डेकर बस धावत आहेत याचे कारण म्हणजे तिथल्या पायाभूत सुविधा पुण्यापेक्षा वेगळ्या आहेत. मात्र पुणेकरांनाही ही बस आवडण्याची शक्यता आहे, असं बकोरिया यांनी सांगितलं आहे. आम्ही मुंबईमधील बेस्टशी यासंदर्भात चर्चा करणार आहोत. या बसेस पुण्यासह, पिंपरी चिंचवडमध्ये किती यशस्वी होतील यासाठी एक अहवाल तयार केला जाईल आणि त्यानंतर याबद्दल ठोस निर्णय घेतला जाईल, असंही बकोरिया यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईप्रमाणे पुण्यात देखील “डबल डेकर बस येणार असल्याची शक्यता आहे.
पीएमपीएमएलकडून 2018 मध्ये पुण्यात ई-बस धावली होती. त्यानंतर या बसला चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक पुणेकर आता या ई-बसने रोज प्रवास करताना दिसतात. यापूर्वी अनेक शहरात ई-बसचं संचलन सुरु होतं. त्याच शहरांप्रमाणे पुण्यात ई-बस सुरु करण्यात आली होती. सुरुवातीला पुणेकरांनी या ई-बसमधून प्रवास केला नाही मात्र आता शेकडो पुणेकर प्रवासासाठी ई-बसचा वापर करताना दिसत आहेत. त्यानंतर शहरातच नाही तर आजूबाजूच्या परिसरातदेखील ई-बसचं संचलन सुरु करण्यात आलं. त्याप्रमाणे चार्जिंग स्टेशनचीही संख्या वाढवण्यात आली.
काही दिवसांपूर्वी साताऱ्यातील कास पठार येथे चार ई-बसचं लोकार्पण करण्यात आलं. तेथील पर्यटनाला चालना देण्यासाठी वॉक वे तसेच दर्शन गॅलरी (व्हिव्हिंग गॅलरी) सुरु करणे, स्थानिकांना रोजगार वाढवण्यासाठी आराखडा तयार करणं यावर चर्चा सध्या प्रशासनामध्ये चर्चा सुरु आहे. मात्र ई-बसेसमुळे कास पठारावरील पर्यटन आता प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक होणार आहे.