मुंबईच्या दादर येथील महात्मा गांधी तरण तलाव परिसरातील ऑलिंपिक आकारच्या जलतरण तलावात आज, मंगळवारी पहाटे ५:३० च्या सुमारास मगरीचे पिल्लू आढळून आले आहे. हे पिल्लू तज्ज्ञांच्या मदतीने पकडण्यात आले असून ते वनखात्याच्या ताब्यात देण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच हे मगरीचे पिल्लू तरण तलावात कुठून आले, याची चौकशी करण्यात येईल व त्यानुसार आवश्यक ती प्रतिबंधात्मक काळजी भविष्यात घेण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना जलतरण तलाव व नाट्यगृहांचे समन्वयक संदीप वैशंपायन यांनी सांगितले की, रोज पहाटे तरण तलाव सदस्यांसाठी सुरू करण्यापूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांद्वारे तरण तलावाचे काळजीपूर्वक निरीक्षण करण्यात येते. यानुसार आज पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास तरण तलावाचे निरीक्षण करीत असताना ऑलम्पिक आकाराच्या व शर्यतीसाठीच्या तरण-तलावात (Olympic size Racing Swimming Pool) मगरीचे पिल्लू आढळून आले. त्यानंतर तज्ञांच्या मदतीने तात्काळ कार्यवाही करीत हे पिल्लू सुरक्षितपणे पकडण्यात आले आहे. हे पिल्लू वनखात्याच्या ताब्यात देण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही सुरू आहे, अशी ही माहिती देण्यात आली आहे.