रायगडावर मोठ्या दिमाखात छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा आज (शुक्रवार) तिथीनुसार साजरा होत आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह विविध मंत्री, शिवभक्त उपस्थित आहेत. हा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा राहिला.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शिवरायांची आरती करण्यात आली. यावेळी उदयनराजे भोसले यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराजांना पोलिसांच्या वतीने मानवंदना देण्यात आली. पोलिस वाद्यांचे वादन झाले. विविध ढोलपथकांनी देखील या ठिकाणी वादन केले. ढोलताशकांच्या वादनाने संपूर्ण किल्ले रायगड दुमदुमून गेला.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओच्या माध्यमातून या शिवराज्याभिषेक सोहळ्यास शुभेच्छा दिल्या. मोदींनी आपल्या भाषणाची सुरवात मराठीतून केली. मोदींनी मराठीतून शिवराज्यभिषेक सोहळ्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवरायाच्या कार्यपद्धतीचा दाखला नरेंद्र मोदींनी दिला. शिवाजी महाराज यांच्या विचारांची आठवण मोदींनी यावेळी करुन दिली. शिवरायांच्या विचाराने आपला पुढचा प्रवास सुरु आहे, असे मोदी म्हणाले. मोदी म्हणाले, “शिवरायांनी कायम एकतेला महत्व दिले. शिवाजी महाराज यांनी नुसते परकियांचे आक्रमण रोखलं नाही, तर नवराष्ट्रनिर्माण करण्यासाठी जनतेला प्रेरित केलं,”
रायगडावर शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यासाठी अवघ्या रायगडावर फुलांची आरास करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला यावेळी फुलांनी सजवण्यात आले. महाराजांचा बसलेल्या स्थितीतील चांदीचा पुतळा पालखीसाठी सजवण्यात आली. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी-जय शिवाजी’ असा घोषणांनी संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला.