पिंपरी चिंचवडमध्ये 18वे जागतिक मराठी संमेलन पार पडत आहे. पिंपरीतील डॉ डी वाय पाटील विद्यापीठात या संमेलनाचं उद्घाटन झालं. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह दिग्गज उपस्थित होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांचा सन्मान करताना त्यांना देण्यात आलेला लिफाफ्यातील चेक थेट शरद पवारांनी उघडून पाहिला. पवारांच्या या कृतीला सभागृहात सर्वांनी दाद दिली. मोहन आगाशे यांना जागतिक मराठी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर रामदास फुटाणे यांनी हाच धागा धरून मोहन आगाशे चेकवरील रक्कम पाहून चेकाळले आहेत, अशी मिश्किल टिपणी केली.
तेव्हापासून तर मी दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये जायलाही घाबरतो- शरद पवार
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, परदेशातील एका कार्यक्रमात रशियाची एक महिला भेटली, ती शुद्ध मराठीत बोलते. तीच रशियन वारी ही करते, तिला विचारलं कसे जाता? त्या म्हणाल्या पायी जाते. आळंदी ते पंढरपूर पायी जातात त्याला वारी म्हणतात. अन् सासवड, बारामती अशा ठिकाणी येऊन वारीसोबत जोडतात, ते हौशी वारकरी असतात. वारीबद्दल ह्या महिलेला माहिती होती, कारण त्या महिलेस मराठी बद्दल आस्था आहे, असं पवार म्हणाले. पवार म्हणाले की, सुशीलकुमार शिंदे यांचा आवर्जून उल्लेख करु इच्छितो, कारण ते म्हणाले मी शरद पवारांच्या तालमीत तयार झालो. हल्ली मला असं कोणी म्हटलं की भीती वाटते. त्याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी कोणीतरी म्हटलं की शरद पवारांचे बोट धरून राजकारणात आलो. तेव्हापासून तर मी दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये जायलाही घाबरतो, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी चिमटा काढला.
शरद पवार कधी कोणत्या प्रकारची स्कीम काढतील हे सांगता येत नाही- सुशीलकुमार शिंदे
सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, पी डी पाटील यांचं मराठीवर कृतिशील प्रेम आहे. 89व्या साहित्य संमेलनात ही त्यांनी हे सिद्ध केलं. तेव्हा ही सर्व माजी संमेलनाध्यक्षांना आर्थिक मदतीचा हात पुढं केला. शरद पवार यांची संमेलनाची संकल्पना आहे. मुळातच शरद पवार कधी कोणत्या प्रकारची स्कीम काढतील हे सांगता येत नाही. मी शरद पवारांच्या तालमीतच तयार झालोय. माझ्यापेक्षा साडे आठ महिन्यांनी ते मोठे आहेत. तरी ते रोज चार-पाच कार्यक्रम घेतात. मला काय हे जमत नाही. रोज त्यांचा चेहरा प्रफुल्लित असतो, कधी ही थकलेले आहेत असं जाणवत नाही. ताठ मानाने उभा राहून महाराष्ट्रासाठी काम करणारा हा नेता आहे. हेच या जागतिक मराठी संमेलनाचं वैशिष्ट्य आहे, असं शिंदे म्हणाले. सत्ता येत असते जात असते, पण मराठीवरील प्रेमाची भूक काही कमी होत नाही. त्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहुयात, असं आवाहनही शिंदे यांनी कार्यक्रमात केलं.
जागतिक मराठी संमेलनाची मूळ संकल्पना शरद पवारांची
रामदास फुटाणे म्हणाले की, 35 वर्षांपूर्वी जागतिक मराठी संमेलनाची मूळ संकल्पना शरद पवारांची होती. या संमेलनाला कोणतंही राजकीय रंग देऊ नका, असं स्पष्टपणे सांगितलं होतं. तशी माझ्यावर जबाबदारी टाकली अन् आज 18वे जागतिक मराठी संमेलन भरलेलं आहे.