जल्लोषात सुरू झालेल्या ‘मुंबई टाइम्स कार्निव्हलचा सांगता सोहळाही तितक्याच दमदार पद्धतीनं झाला. लोकप्रिय गायक, संगीतकार, दिग्दर्शक अवधूत गुप्तेशी अभिनेता पुष्कर श्रोत्रीनं संवाद साधला. या गप्पांमधून समाजकारणाची आवड असणारा ते हलक्याफुलक्या गाण्यांवर थिरकणारा अवधूत असा त्याच्या जगण्याचा व्यापक पट उलगडला. यावेळी पुष्करने अवधूतला थेट राजकारणाशी संबंधीत प्रश्न विचारला.
अनेक राजकीय पक्षांनी अवधूत गुप्तेला आपल्याकडे खेचायचा प्रयत्न केला. राजकारणात जावंसं वाटत नाही की जायचंय? पुष्करच्या या प्रश्नाचं अवधूतनेही अगदी थेट उत्तर दिलं. गायक म्हणाला की, ‘कोणतीही निवडणूक आली की, विचारणा होतेच. त्यामुळे मी राजकारणात प्रवेश करणार आहे हे आता जाहीरच करून टाकतो. कशासाठी राजकारणात यायचं किंवा कोण चांगलं राजकारण करू शकतं? ज्यांना राजकारणाच्या माध्यमातून स्वतःचं पोट भरायची भ्रांत नाही; तो चांगलं राजकारण करू शकतो.
आताची कर्तव्यांची इतिपूर्तता होईल, संसार, कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या संपलेल्या असतील, जेव्हा काही मिळवायचं नाही किंवा काही गमवायचं नाही अशा वेळी राजकारणात येईन. २०२९च्या आमदारकीत मी हे सगळं पाहतोय. त्यावेळी लोकही माझ्यावर ‘राजकारणात येण्यामागे माझा काही हेतू आहे’ अशी शंका घेऊ शकणार नाहीत. मलाही खात्री आहे की, मी समाजकार्यासाठी म्हणून राजकारणात येईन. मी राजकारणासाठी प्रामाणिकपणे फक्त पाच वर्षंच देईन. आपण घर साफ करतो, तशी प्रत्येकानं आपली छोटीशी चौकट, काही काळापुरती प्रामाणिकपणे साफ केली तर भारत बदलायला वेळ लागणार नाही. मी ज्या दिवशी येईन तेव्हा जाण्याचीही तारीख जाहीर करेन.’