राजस्थानच्या प्रतापगडमध्ये आदिवासी महिलेची विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी तिच्या पतीसह 7 जणांना अटक करण्यात आलीय. पिडीतेच्या पतीने 31 ऑगस्ट रोजी हा घृणास्पद प्रकार केला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत राजस्थान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी 31 ऑगस्ट रोजी एका आदिवासी महिलेला तिच्या पतीने गावकऱ्यांसमोर विवस्त्र केले होते. पीडित महिलेचे वय 21 असून तिला तिच्या सासरच्यांनी जबरदस्तीने गावी नेले. मात्र तिचे दुसऱ्या पुरुषाशी संबंध होते. ती त्याच्या सोबत राहत होती. यामुळे सासरच्या मंडळींना राग आला. महिलेच्या पतीने गावकऱ्यांसमोरच तिला विवस्त्र केले. याचा व्हिडिओ शुक्रवारी 1 सप्टेंबर रोजी व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये महिला स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असून ती किंचाळत आहे. मात्र गावकरी बघ्याची भूमिका घेताना दिसून आले. आरोपी नवरा पिडीत महिलेचे कपडे फाडतोय, गावकऱ्यांसमोर स्वतःच्या पत्नीला विवस्त्र करतोय असे दृश तिथे उपस्थित लोकांनी टिपले आहे. यात सर्वात वाईट बाब म्हणजे, महिलेला वाचवण्यासाठी गावातील कोणीही पुढे आले नाही. उलट गावकरी या घटनेचा व्हिडिओ बनवत असल्याचे दिसून आले.
या घटनेनंतर मुख्यमंत्री अशोक गेहेलोत यांनी ट्विट केले आहे. प्रतापगड जिल्ह्यात एका वादावरून महिलेला तिच्या सासरच्या लोकांनी विवस्त्र केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सुसंस्कृत समाजात अशा गुन्हेगारांना स्थान नाही. फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवण्यात येणार असून लवकरात लवकर शिक्षा होईल असे यावेळी ट्विटमध्ये म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या ट्विटनंतर पोलिसांनी पिडीतेच्या पतीसह 7 जणांना अटक केलीय.