राठी चित्रपटससृष्टी आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रितेशदेशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख यांची जोडी रुपेरी पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. त्यांचा वेड (Ved) हा चित्रपट रिलीज होऊन चार दिवस झाले आहेत. या चित्रपटात रितेश आणि जिनिलिया यांच्यासोबतच अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि जिया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटानं रणवीर सिंहच्या सर्कस या चित्रपटाला मागे टाकत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
वेड हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी 2.25 कोटींची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 3.25 कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी या चित्रपटानं 4.50 कोटी कमावले. आता चौथ्या दिवशी देखील या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली आहे. चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी या चित्रपटानं 3.02 कोटींची कमाई केली. आता या चित्रपटाची एकूण कमाई 13.02 कोटी एवढी झाली आहे.
सर्कस या चित्रपटानं सोमवारी केवळ 75 लाख रुपयांची कमाई केली आहे. तर वेड चित्रपटानं सर्कसला मागे टाकत सोमवारी 3.02 कोटींची कमाई केली. वेड चित्रपटामधील एका गाण्यात सलमान खाननं काम केलं आहे. या चित्रपटातील बेसुरी, सुख कळले, वेड लागलंय या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. संगीतकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. वेड चित्रपटाचे दिग्दर्शन रितेशनं केलं असून चित्रपटाची निर्मिती जिनिलियानं केली आहे.