लातूर शहरात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात दुचाकी स्वारांकडून धूम स्टाईलने दुचाकी चालविणे, प्रसंगी विनापरवाना वाहन चालविणे, ट्रिपल सीट त्याचबरोबर दुचाकी वर मोबाईल वरून संभाषण करणे अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात वाहतूक नियंत्रण शाखेने 1 फेब्रुवारी पासून विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.
या मोहिमे अंतर्गत ट्युशन एरिया, गंजगोलाई, छत्रपती शिवाजी चौक, इतर रहदारीच्या ठिकाणी दुचाकीस्वारांवर, प्रवाशांना फ्रंटसीट बसणार्या ऑटो चालकावर धडक कारवाई करून 1,2 फेब्रुवारी या दोन दिवसाच्या कालावधीत वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करणार्या दुचाकी, ऑटो रिक्षा चालकाकडून 1 लाख 13 हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.दिवसेंदिवस दुचाकी, चारचाकी वाहनांची वाढती संख्या, होणारे छोटे-मोठे अपघात त्याचप्रमाणे चारचाकी, दुचाकीस्वारांकडून मोटार वाहन कायद्याच्या नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे.
काही दुचाकीस्वार क्षमतेपेक्षा जास्त म्हणजेच ट्रिपल सीट बसवून भरधाव वेगात, बेजवाबदार पणे शहरात फिरत असल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. त्यांचे वर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये ट्रिपल सीट दुचाकी स्वारावर कडक कारवाईची मोहीम राविण्यात येत आहे. यानंतरही वाहतूक नियमांचे उल्लंघन करून क्षमते पेक्षा जास्त लोकांना वाहनांमध्ये बसवून प्रवास करणार्या दुचाकी, चारचाकी वाहन चालकावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. वेळोवेळी दंडात्मक कार्यवाही करून ही नियमांचे उल्लंघन करणार्या वाहन चालवण्याचे परवाना रद्द करणे बाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे.
लातूर जिल्हा पोलीस दलाकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करून स्वतःसह इतरांच्या जीविताचे रक्षण करावे.हि विशेष मोहीम वरिष्ठांचे मार्गदर्शनात वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार बिर्ला, पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख, त्यांच्या पथक पथकातील पोलिस अमलदार हासुळे, मनाळे, सुरवसे, डोंगरे, केंद्रे, जानकर, गुरव यांच्याकडून राबविण्यात येत आहे.