श्वेता सहरावातच्या तुफानी खेळीने अंडर-१९ महिला टी-२० वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडचा ८ विकेटने पराभव केला आणि या विजयासह भारतीय संघाने फायनलमध्ये एन्ट्री घेतली. अशाप्रकारे भारतीय महिला संघाला पहिल्याच वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचण्याची संधी आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा संघ फलंदाजी करत २० ओव्हरमध्ये १०७ धावाच करू शकला. त्यानंतर धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने केवळ १४.१ षटकारांमध्ये २ विकेट्स गमावून विजयी रेष ओलांडली. १९ वर्षांखालील महिला टी-२० वर्ल्ड कपचा हा पहिला सेमीफायनल सामना आहे.
न्यूझीलंडने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाच्या श्वेताने ४५ चेंडूमध्ये ६१ धावा केल्या. यावेळी तिने एकूण १० चौकार मारले. श्वेताशिवाय सौम्या तिवारीने २६ चेंडूत २२ धावा केल्या. तर कर्णधार शेफाली वर्माने १० धावा केल्या.
भारतीय खेळाडूंसमोर न्यूझीलंडची टॉप ऑर्डर कोलमडली होती. न्यूझीलंडने केवळ १० षटकारांत पाच विकेट गमावल्या. संघाची ओपनर फलंदाज केवळ तीन धावा करू शकली. न्यूझीलंडसाठी जॉर्जिया प्लमेरने सर्वाधिक ३२ चेंडूमध्ये ३५ धावा केल्या. त्याशिवाय इसाबेल गेजने २२ चेंडूमध्ये २६ धावा केल्या. सहा फलंदाज दुहेरी धावसंख्याही करू शकले नाहीत आणि भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे गुडघे टेकले.
सहा सामन्यांमध्ये श्वेता सहरावत २९२ धावा करत आतापर्यंत स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारी फलंदाज आहे. तर प्रशस्वी चोप्राने पाच सामन्यात भारतासाठी सर्वाधिक नऊ विकेट्स घेतल्या आहेत.
आता फायनलमध्ये भारताची लढत स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलमधील विजेत्या संघाबरोबर होणार आहे. दुसऱ्या सेमीफायनलची लढत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया अंडर-१९ यांच्यात खेळला जाईल. तर अंतिम सामना रविवारी २९ जानेवारी रोजी होणार आहे.