भारतीय हवाई दल 100 मेड-इन-इंडिया ‘एलसीए-मार्क 1-ए’ लढाऊ विमाने खरेदी करणार आहे. भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी स्पेन दौऱ्यावर याबाबत घोषणा केली. ‘एलसीए-मार्क 1-ए’ ही तेजस विमानाची प्रगत आवृत्ती आहे. हे अपग्रेडेड एव्हीओनिक्स आणि रडार सिस्टमने सुसज्ज आहे. हवाई दलाने यापूर्वीच 83 एलसीए मार्क-1ए विमानांची ऑर्डर दिली आहे.
भारतीय वायुसेना लवकरच मिग-21 ही जुने विमान निवृत्त करणार आहे. त्याऐवजी ‘एलसीए-मार्क 1-ए’ ही विमाने खरेदी करण्यात येणार आहे. या कराराचा अधिकृत प्रस्ताव संरक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय सुरक्षा भागधारकांना पाठवण्यात आला आहे.हवाई दल प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीनंतर आणखी 100 ‘एलसीए-मार्क 1-ए’ लढाऊ विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे (एचएएल) अधिकारीही सहभागी झाले होते. हा करार पूर्ण झाल्यानंतर, पुढील 15 वर्षांत भारताकडे 40 एलसीए तेजस, 180 एलसीए मार्क-1ए पेक्षा जास्त आणि किमान 120 एलसीए मार्क-2 विमाने असण्याची अपेक्षा आहे.यापूर्वी, भारताने 83 एलसीए मार्क-1ए विमानांची ऑर्डर दिली होती, जी फेब्रुवारी 2024 मध्ये वितरित केली जाऊ शकतात. ‘एलसीए-मार्क 1-ए’ ची 65 टक्क्यांहून जास्त उपकरणे भारतात बनवली जातात. एरोस्पेसमध्ये भारताच्या आत्मनिर्भरता आणि मेक-इन-इंडियाच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.