भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे भारतीय संघासह त्याच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का बसला आहे. पांड्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाचा संघात समावेश करण्यात आला आहे.
भारतीय संघाने उपांत्य फेरीत दणक्यात प्रवेश केला आहे. यामध्ये हार्दिक पांड्याचा मोठा वाटा आहे. अशातच दुखापतीमुळे संघातून बाहेर गेलेला पांड्या अखेरच्या सामन्यापर्यंत संघात पुनरागमन करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, दुखापतीमुळे पांड्या विश्वचषकाचे उर्वरित सामने खेळणार नसल्याची माहिती मिळत आहे. विश्वचषक स्पर्धेदरम्यान पुण्यात बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात त्याच्या पायाला दुखापत झाली होती. त्या सामन्यातही पांड्याने केवळ तीनच चेंडू टाकले होते. त्यानंतर भारतीय संघ मागील न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्धचा सामना पांड्याशिवाय खेळले आहेत. हार्दिकच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली होती आणि तो पुनर्वसनासाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत होता. तेव्हापासूनच चाहते हार्दिकच्या पुनरागमनाकडे डोळे लावून बसले होते. मात्र, आता चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. ऑलराउंडर हार्दिक पांड्या विश्वचषकातील उर्वरित सामने खेळणार नसल्याचे समोर आले आहे.
रविवारी (५ नोव्हेंबर) भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. तशी भारताने हार्दिक पांड्याशिवाय खेळण्याची मानसिक तयारी ठेवली होती. आता हार्दिकच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या कामगिरीकडे सर्वच क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.