ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची (कमर्शियल) किंमत सुमारे 100 रुपयांनी वाढली आहे. या दरवाढीचा परिणाम रेस्टॉरंट व्यवसायावर दिसून येईल. दरम्यान घरगुती सिलेंडरच्या किंमतीत मात्र यंदाही कोणताही बदल झालेला नाही.
मुंबईत कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत 1785.50 रुपयांवर आली असून 101.50 रुपयांनी महागली आहे. ऑक्टोबरमध्ये त्याचे दर 1684 रुपये होते. दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 1833 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. गेल्या महिन्यात 1 ऑक्टोबर रोजी कमर्शियल सिलेंडरची किंमत 1731.50 रुपये होती. दिल्लीत आजपासून कमर्शियल एलपीजी 101.50 रुपयांनी महाग झाला आहे. कोलकातामध्ये एलपीजीची किंमत 103.50 रुपयांनी वाढून 1943 रुपयांवर पोहोचली आहे, तर गेल्या महिन्यात त्याचा दर 1839.50 रुपये झाला होता. तर चेन्नईमध्ये गॅस सिलेंडरची किंमत 1999.50 रुपयांवर आली असून 101.50 रुपयांनी वाढली आहे. ऑक्टोबरमध्ये त्याचे दर 1898 रुपये होते.
गेल्या महिन्यातही तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतींत 209 रुपयांनी वाढ करून लोकांना मोठा धक्का दिला होता. यानंतर दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1731.50 रुपयांवर आली. सलग दुसऱ्या महिन्यात तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजीच्या किंमतीत वाढ केली आहे. मागील तीन महिन्यांमध्ये 311 रुपयांनी व्यावसायिक एलपीजीचे दर वाढले आहेत.
19 आणि 14.2 किलो एलपीजी सिलेंडरमध्ये फरक काय?
हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडर वापरतात. त्याचा घरगुती वापर करता येत नाही. घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या वजनात फरक आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 19 किलो वजनाचा असतो आणि घरगुती एलपीजी सिलेंडर 14.2 किलो वजनाचा असतो.