सोशल मीडियावरील सर्वात प्रभावी प्लॅटफॉर्म असलेल्या व्हॉट्सअॅपने गंभीर चूक केली आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी व्हॉट्सअॅपचा समाचार घेतल्यानंतर व्हॉट्सअॅपने झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. व्हॉट्सअॅपने त्यांच्या ट्विटर हँडलवर भारताचा चुकीचा नकाशा दर्शविणारे ग्राफिक पोस्ट केले होते. नंतर त्यांनी ते ट्विट डिलीट करत माफी मागितली आहे.
जगाच्या नकाशात भारताला हायलाइट करताना पाकव्याप्त काश्मीर आणि चीनने दावा केलेला काही भारतीय भूभाग भारताच्या नकाशातून वेगळा दाखवला होता. ही बाब लक्षात येताच राजीव चंद्रशेखर यांनी ट्विटरवर पोस्ट केलेला भारताचा चुकीचा नकाशा काढून टाकण्याचे निर्देश व्हॉट्सअॅपला दिले. त्यानंतर व्हॉट्सअॅपने ते ट्विट डिलीट केले आणि याबाबत माफी देखील मागितली. सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मनी योग्य नकाशे वापरणे आवश्यक आहे. भारतात एखाद्या कंपनीला त्यांचे कार्य चालू ठेवायचे असेल, तर त्यांनी भारताच अचूक नकाशा वापरला पाहिजे, असा दम चंद्रशेखर यांनी भरता. त्यानंतर व्हॉट्सअॅपने तात्काळ त्यांचे चुकीचे ट्विट डिलीट केले.
मंत्री चंद्रशेखर यांनी याबाबतचे एक ट्विट करताना म्हटले की, कृपया भारताच्या नकाशातील त्रुटी लवकरात लवकर दुरुस्त करा. भारतात व्यवसाय करणार्या किंवा भारतात व्यवसाय सुरू ठेवू इच्छिणार्या सर्व प्लॅटफॉर्मने योग्य नकाशे वापरणे आवश्यक आहे.
मंत्र्यांनी समाचार घेतल्यानंतर व्हॉट्सअॅपकडून करण्यात आलेले ट्विट डीलीट केले आणि झालेल्या चुकीबद्दल संपूर् भारतीयांची माफी मागत असल्याचे म्हटले. याबरोबरच ही चूक लक्षात आणून दिल्याबद्दल मंत्री महोदयांचे आभार व्यक्त करतो असे व्हॉट्सअॅपने म्हटले आहे. भविष्यात अशा गोष्टींपासून आम्ही सावध राहू, असे ट्विट व्हॉट्सअॅपने केले आहे.