तभा वृत्तसेवा,
सोलापूर, दि. ३ नोव्हेंबर –
शहरातील व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो मैदानांबरोबरच टेबल टेनिस हॉलसाठी भाडे आकारणीच्या महापालिकेच्या प्रस्तावास क्रीडा संघटनांनी विरोध केला आहे.
सोलापूर जिल्हा व्हॉलीबॉल संघटना, सोलापूर जिल्हा कबड्डी संघटना, सोलापूर जिल्हा टेबल टेनिस संघटना, याचप्रमाणे स्पोर्ट्स पॅव्हेलियनने निवेदन देऊन मैदानांसाठी कोणत्याही प्रकारची भाडे आकारणी करू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे आयुक्तांकडे केली आहे.
व्हॉलीबॉल संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. बाळासाहेब भास्कर, सहसचिव मिलिंद गोरटे, खजिनदार ॲड. प्रशांत कांबळे, स्पोर्ट्स पॅव्हेलियनचे अध्यक्ष प्रकाश भुतडा, कबड्डी संघटनेचे मरगु जाधव, टेबल टेनिस संघटनेचे झेड. एम. पुणेकर आदींच्या शिष्टमंडळाने महापालिका उपायुक्त तथा स्टेडियम कमिटीचे सचिव मच्छिंद्र घोलप यांचेकडे निवेदन सादर केले.
व्हॅालिबॅाल संघटनेने निवेदनात म्हटले आहे, की महापालिका स्टेडियम कमिटीच्या उद्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीतील प्रस्तावित विषयांत भाडे आकारणीचा समावेश आहे.
संघटनेला पार्क मैदानावर महापालिकेने सुरवातीपासून मैदान उपलब्ध करून दिले. गेल्या काही वर्षांत विद्युत प्रकाश झोताचीही सोय करून दिली. त्याचा खेळाडूंसाठी उपयोग झाला.
व्हॅालिबॅाल खेळण्यासाठी येणाऱ्या खेळाडूंकडून संघटना कोणतेही शुल्क आकारत नाही. साहित्य, स्पर्धेसाठी संघटक पदरमोड करतात. पार्क मैदानावरील व्हॅालिबॅाल मैदान दोन-तीन वर्षे खराब झालेले आहे. त्याबाबत क्रीडा विभागाकडे संघटनेने वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. स्मार्ट सिटी योजनेतून गेल्या काही महिन्यापासून मैदान नूतनीकरणाचे काम सुरू आहे. हे काम संघटनेला विश्वासात घेऊन शास्त्रीय पद्धतीने होणे गरजेचे आहे. नव्या मैदानावर जोमाने सराव सुरू करण्याच्या प्रयत्न संघटना करीत असताना भाडे आकारणीचा प्रस्ताव चर्चेला आल्याने संघटक हाबकून गेले आहेत. संघटना खेळाडूंकडून कोणतेही शुल्क आकारत नाहीत. ते खेळाडूंना शक्यही नसते. संघटना असे भाडे देऊ शकणार नाही.
मैदानाची व्यवस्था महापालिकेकडून होते, हे संघटना आणि खेळाडूंसाठी सहाय्यभूत ठरते. भाडे आकारणीचा थेट परिणाम खेळाडूंवर आणि खेळाच्या विकासावर होणार आहे. महापालिकेची भूमिका ही क्रीडा क्षेत्रासाठी सहकार्याची, पाठिंब्याची राहणे गरजेचे आहे. त्यामुळे स्टेडियम कमिटीच्या बैठकीमध्ये व्हॅालिबॅालसह कुठल्याही मैदानाला भाडे आकारणीचा प्रस्ताव पारीत केला जाऊ नये, असे विनंती निवेदन मनपा उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांना देण्यात आले आहे.