येत्या पंधरा दिवसांत शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतील, असा दावा आमदार रवी राणा यांनी अमरावतीत केला आहे. रवी राणा यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आमदार रवी राणा यांनी अमरावतीत गणेश विसर्जनानंतर प्रसार माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी आ. राणा यांनी मोठं राजकीय भाष्य केलं.
आ. राणा म्हणाले, ‘मुंबईला आठ दिवसांपूर्वी लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलो. तेव्हा लालबागच्या राजाकडे मागितलं की, देशात पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे काम सुरू आहे. त्यांचे काम पाहून अजित पवार सत्तेत सहभागी झाले. त्यांनी केंद्रातही देशाच्या विकासासाठी पंतप्रधान मोदींना पाठिंबा दिला आहे’.
अजित पवार मुख्यमंत्री होण्याबाबतच्या चर्चांवर भाष्य करताना आ. राणा म्हणाले, ‘अजित पवार मुख्यमंत्री होतील अशा चर्चा मी देखील ऐकल्या आहेत. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते, ते उपमुख्यमंत्री झाले. अजित पवार हे विरोधी पक्षनेते होते. ते आता उपमुख्यमंत्री झाले. ठाकरे सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री होते, ते मुख्यमंत्री झाले. राजकारणात कोणतीही गोष्ट शक्य आहे. येत्या पंधरा दिवसांत शरद पवार सरकारसोबत आले तर हेही शक्य असल्याचे आ. राणा म्हणाले.