सोलापूर: एक हजार लोकसंख्या असलेल्या लहानश्या खेड्यातून मी कलेक्टर झाले. शाळेत मी शिकत असताना लोक चेष्टा करीत होते. ही मुलगी काय शिकणार. कुठे मोठ्या पदावर काम करणार. त्यामुळे माझ्यामध्ये जिद्द निर्माण झाली व मी आयएएस पदापर्यंत गेले, असा अनुभव झेडपीच्या प्रभारी सीईओ मनिषा आव्हाळे यांनी किशोरिंशी संवाद साधताना सांगितला.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त झेडपीच्या प्राथमिक शिक्षण विभाग व मोहोळ पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मोहोळमधील नेताजी प्रशालेत आयोजित जिल्हास्तरीय किशोरी हितगुज मेळाव्यात त्या बोलत होत्या. किशोरी मेळाव्याचे उदघाटन प्रभारी सीईओ आव्हाळे यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित 700 मुलींशी त्यांनी संवाद साधला. मुलींनो तुम्ही सक्षम बना असे आवाहन त्यांनी यावेळी केले. खेड्यातील मुलींना शिक्षण घेणे फार अवघड असते हे सांगताना त्यांनी स्वत: कसे कष्ट उपसले याची कहाणी सांगितली. लहानश्या खेडेगावातून शिकून मी पुढे आले. मी शिकत असताना लोक चेष्टा करत होते, ही मुलगी काय शिकणार? कुठे मोठ्या पदावर काम करणार असे बोलले जात होते. त्यामुळे मी जिद्दीने प्रयत्न करून मंगरूळपीर या गावातून शिकून पुढे आले. पदवी संपादन करून स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यामुळेच सध्या सहाय्यक जिल्हाधिकारी या पदावर काम करीत आहे. आता झेडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळावा लागत आहे. त्यामुळे मुलींनो कशाचीही भीती न बाळगता, कोणालाही न डगमगता शिक्षण घेतले पाहिजे असे आवाहन आव्हाळे यांनी केले.