शिवप्रेमींसाठी एक मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा कॅलिफोर्नियातील एकमेव पुतळा चोरीला गेल्याची घटना घडली आहे. उत्तर अमेरिकेतील सॅन जोस उद्यानातून महाराजांचा पुतळा चोरीला गेला आहे. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे याचं पुण्याशी कनेक्शन असल्याचं सांगण्यात येत आहे. हा पुतळा चक्क कापून चोरी करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सॅन जोस पार्क विभागाने यासंबंधी ट्वीट करून माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहलं आहे की, ‘ग्वाडालुपे रिव्हर पार्कमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गायब झाला आहे. हे कळवताना आम्हाला अत्यंत खेद होत आहे. मात्र, हा पुतळा कधी चोरीला गेला? याबद्दल अद्याप माहिती स्पष्ट झालेली नाही’
खरंतर, अमेरिकेतील हा महाराजांचा पुतळा पुण्यातून भेट म्हणून देण्यात आला होता. उत्तर अमेरिकेतील मराठा शासकाचा हा एकमेव पुतळा होता. या घटनेनंतर संपूर्ण शहरामध्ये नाराजी पसरली असून शिवप्रेमींनी दु:ख व्यक्त केलं आहे. दरम्यान, आम्ही पुतळ्याचा शोध घेत असून शक्य तितक्या लवकर पुतळा शोधू अशी माहिती विभागाकडून देण्यात आली आहे. या घटनेची चौकशी सुरू असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.
खरंतर, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास खूप मोठा आहे. ते एक भारतीय शासक आहेत ज्यांनी १६०० च्या उत्तरार्धात इस्लामिक आक्रमकांविरुद्ध लढा दिला आणि मराठा साम्राज्याची स्थापना केली. ते एक महान योद्धा तर होतेच पण त्यांचं शौर्य, रणनीती, कौशल्य सगळ्यांसाठी प्रेरणादायी होतं. त्यांनी नेहमीच स्वराज्याच्या हितासाठी लढा दिला. मराठी वारसा टिकावा यावर त्यांनी भर दिला. त्यामुळे त्यांचाच पुतळा चोरी गेल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजी आहे.