ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचं निधन झालंय. वयाच्या 102 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. औरंगाबादमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केशवराव धोंडगे हे दीर्घकाळ विधिमंडळाचे सदस्य राहिले. त्यांनी आमदार आणि खासदार म्हणून त्यांनी लोकांचं प्रतिनिधित्व केलं. विधानसभेतील त्यांची अनेक भाषणं प्रचंड गाजली. जनतेच्या प्रश्नासाठी लढणारा नेता अशी त्यांची ख्याती होती. केशवराव धोंडगे हे पाच वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.मराठवाड्याची मुलुख मैदानी तोफ म्हणून ते परिचित होते.कंधार तालुक्यातील गऊळ गावात त्यांचा जन्म झाला. पिचलेल्या समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी ते कायम आग्रही होते. त्यांनी अनेक आंदोलनं केली. सरकारला प्रश्न विचारले.
खासदार पदी एकदा आणि आमदार पदी पाचवेळा प्रतिनिधित्व करत त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. निर्भीड आणि स्वाभिमानी प्रामाणिक बाणा त्यांनी सोडला नाही.विधानसभेचं कामकाज सुरु होण्याआधी ते सभागृहात हजर असत. तर विधानसभा संपल्या नंतर सर्वात शेवटी ते तिथून निघत हे त्यांचं वैशिष्ट्य!
डॉ.केशवराव धोंडगे यांच्या नेतृत्वाखालील आणीबाणी विरोधी लढा लढला गेला. नाशिक सेंट्रल कारागृहामध्ये 14 महिनै कारावास भोगत स्वाभिमानी बाणा दाखवला.1985 साली गुराखीगड स्थापण करुन जागतिक गुराखी साहित्य संमेलन आणि जागतिक गुराखी लोकनाट्य संमेलन भरवून अनोखा विक्रम केला.रेकॉर्डब्रेक जवळपास हजारो सत्याग्रह विविध नाव देवून यशस्वी केले.त्यात पिंडदान सत्याग्रह, बोंबल्या सत्याग्रह, शेणचारऊ सत्याग्रह, खईस कुत्री सत्याग्रह ठळक आहेत.