बिग बॉस आणि नागिन ६ फेम अभिनेत्री महक चहलची तब्येत बिघडली असल्याची माहिती आहे. मागील चार दिवसांपासून ती रुग्णालयात दाखल असून तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होत. मीडिया रिपोर्ट्सनुसार ही हेल्थ अपडेट समोर आली असून चार दिवसांपासून तिला आयसीयूमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती आहे. आता अभिनेत्रीची तब्येत आधीपेक्षा बरी असून ती अद्यापही रुग्णालयात आहे. महक चहलला नेमकं काय झालं?
तीन ते चार दिवस महक आयसीयूमध्ये होती. तिला ऑक्सिजन व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. महक २ जानेवारी रोजी अचानक बेशुद्ध झाली होती. तिला छातीत दुखू लागलं होतं. श्वासही घेता येत नव्हता. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
महक चहलने याबाबत बोलताना सांगितलं, की रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तिचं सिटी स्कॅन करण्यात आलं. यात तिच्या दोन्ही फुफ्फुसात इन्फेक्शन झाल्याचं समजलं. ती अद्यापही रुग्णालयात असून तिला आयसीयूतून नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. रुग्णालयात दाखल होऊन तिला ८ दिवस झाले असून आता तिच्या तब्येतीत काहीशी सुधारणा होत आहे. मात्र तिला ऑक्सिजन वरखाली होत असल्याची समस्या अद्यापही आहे.
आतापर्यंत अशाप्रकारे कधीही आजारी न पडल्याने अतिशय घाबरल्याचं तिने सांगितलं. बेशुद्ध अवस्था, श्वास घेण्यास त्रास, छातीत वेदना अशा परिस्थितीत तिला नेमकं काय झालंय हे समजत नसल्याचंही तिने म्हटलं. अभिनेत्रीची प्रकृती अचानक बिघडल्यानंतर आता तिच्या चाहत्यांकडूनही चिंता व्यक्त केली जात आहे.