ज्येष्ठ गायिका सुमित्रा सेन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांची मुलगी श्रावणी बेन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.
श्रावणीने लिहिलं आहे,”आज सकाळी आईचे निधन झाले आहे”. सुमित्रा सेन यांच्या निधनाबद्दल बंगली सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे. सुमित्रा सेन यांची अनेक गाणी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहेत. यात ‘मेघ बोलेछे जाबो जाबो’, ‘तोमरी झरने निरंजन’,’सखी भाबोना कहारे बोले’,’अच्छे देखो अच्छे मृत्यू’ या गाण्यांचा समावेश आहे.
सुमित्रा सेन यांना 2012 साली पश्चिम बंगाल सरकारने संगीत सिनेसृष्टीतील मानाच्या पुरस्काराने सन्मानित केले होते. गेल्या काही दिवसांपासून सुमित्रा यांना श्वसनाचा त्रास होत होता. त्यामुळे 21 डिसेंबरला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण तीन दिवसांपूर्वीच प्रकृतीत सुधारणा होत असल्याने त्यांना डिसचार्ज मिळाला होता. पण आज (3 जानेवारी) अचानक प्रकृती खालावल्याने त्यांचे निधन झाले.