महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला तारीख पे तारीख सुरुच असून आता पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार आहे. कदाचित त्याच दिवशी घटनापीठावर निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या प्रकरणावर सलग सुनावणी घेतली जाईल. दरम्यान, पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला निश्चित झाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मिश्कील भाषेत टिप्पणी केली आहे.
घटनेवर आमचं प्रेम आहे, घटनापीठ सलग सुनावणी घेईल,14 फेब्रुवारी व्हलेंटाईन डे प्रेमाचा दिवस आहे, सगळं प्रेमानं होईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. दरम्यान, राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार असून शिवसेनेतील बंडाळी, विधानसभा अध्यक्ष निवड, राज्य सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव, राज्यातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्यावरून ठाकरे आणि शिंदे गटाकडून याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. संजय राऊत म्हणाले की, आमचं राज्यघटनेवर प्रेम आहे, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर घटनापीठ सलग सुनावणी घेणार आहे. आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे.